दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धा; मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

मुंबई,३० ऑगस्ट /प्रतिनिधी :-  दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

यासाठी शासन निर्णय १८ ऑगस्ट, २०२३ नुसार विमा संरक्षण उपलब्ध करून दिलेल्या ५०,००० गोविदांव्यतिरिक्त अतिरिक्त आणखी २५,००० गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याकरीता ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला प्रति गोविंदा ७५ रुपये विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.१८ लाख ७५ हजार  इतका निधी अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती या संस्थेस वितरित करण्यास  मान्यता देण्यात आली असल्याचे  सांगितले.

आता दहीहंडीचा सण जवळ आला असून राज्यभरात गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंदा पतकांचा सराव देखील जोरात सुरु आहे. अशात राज्य सरकारने आता महत्वाचं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने गोविंदांसाठी १८ लाख ७५ हजार रुपयांचं विमा कवच योजना जाहीर केली आहे. ही योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. राज्य सरकारनं या संदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश जारी केले आहेत.

दडीहंडीला खेळाचा दर्जा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. खेळाडूंना नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ गोविंदांना देखळी मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आ्रहे. मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्या ७.५० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर दहीहंडीवेळी हात पाय जायबंदी झालेल्यांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी केली होती. त्यानूसार यंदा गोविंदांच्या कवच योजनेसाठी राज्य सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला आहे.