शेतकरी संकटात!मराठवाड्यात २८ टक्के पाऊस

छत्रपती संभाजीनगर,२५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- राज्यात यावर्षी अपेक्षेपेक्षा खूप कमी पाऊस झाल्याने पावसाबद्दल चिंता वाढवणारी बातमी आहे. फक्त ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात सरासरीच्या उणे ५८ टक्के तूट निर्माण झाली आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. मराठवाड्यात सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील १५ जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत. मात्र दिलासादायक म्हणजे, आता हवामान विभागाने ८ ते २१ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात सरासरीइतका किंवा त्याहून जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीच्या किती तूट?

औरंगाबाद : उणे ३१ टक्के तूट
बीड : उणे ३० टक्के तूट
हिंगोली : उणे ३२ टक्के तूट
जालना : उणे ४६ टक्के तूट
धाराशिव : उणे २० टक्के तूट
परभणी : उणे २२ टक्के तूट

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पीक सुकून चालले आहे. पावसाअभावी शेतकरी अक्षरशः तांब्याने पाणी घेऊन पीकांच्या मुळांशी पाणी घालत आहेत. बळीराजाने प्रेमाने लावलेली त्याची रोपे सुकताना पाहून त्याचा जीव तीळतीळ तुटतोय पण पावसाने पाठ फिरवल्याने आता बळीराजाचं अख्खं कुटुंबच बादली, तांब्या हातात घेऊन रोजच्या वापरासाठीचं पाणी आपल्या बाळांना जगवण्यासाठी वापरत आहे. असंच चित्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाडळी गावातही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमुळे बळीराजा चिंतीत झाला आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे संकटात सापडला आहे. दरम्यान, यंदा मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. पण, ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला असल्याने अनेक ठिकाणी २० दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी हाताने पिकांना थेंब-थेंब पाणी टाकत आहे. एकदा पाणी टाकल्यावर झाडाची किमान तीन चार दिवसांसाठी चिंता मिटते. परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहीरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आता पिण्यासाठी देखील अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने झाडांना टाकण्यासाठी तरी पाणी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोठे किती पाऊस पडला?

  • कोकण विभाग (२८ टक्के पाऊस) : सरासरी ७६६ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात २१७ मिलिमीटर पाऊस झाला.
  • नाशिक विभाग (२० टक्के पाऊस) : सरासरी १९७ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४० मिलिमीटर पाऊस झाला.
  • पुणे विभाग (२२ टक्के पाऊस) : सरासरी २४७ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५४ मिलिमीटर पाऊस झाला.
  • औरंगाबाद विभाग (२२ टक्के पाऊस) : सरासरी १९३ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४४ मिलिमीटर पाऊस झाला.
  • अमरावती (२९ टक्के पाऊस) : सरासरी २३१ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ६८ मिलिमीटर पाऊस झाला.
  • नागपूर (५५ टक्के पाऊस) : सरासरी ३४७ मिलिमीटर पाऊस पडतो, १९३ प्रत्यक्षात मिलिमीटर पाऊस झाला.