तलाठी भरती परीक्षेसाठी उमेदवारांनी सूचवलेली परीक्षा केंद्रच प्राधान्याने द्यावी

आ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर– सध्या विविध जिल्ह्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत मात्र या परीक्षेसंदर्भात उमेदवारांनी सूचवलेली परीक्षा केंद्र न देता त्यांना 400-500 कि.मी अंतरावर असलेल्या जिल्ह्यांच्या ठिकाणची परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे सदरील परीक्षेसाठी उमेदवारांनी सूचवलेली परीक्षा केंद्रेच प्राधान्याने देण्यात यावीत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री .राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आज (दि.22) निवेदनाव्दारे केली आहे.

          आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने 4 हजार 466 तलाठी पदांसाठी भरती जाहीर केली होती. यासाठी राज्यभरातून तब्बल 10 लाख 41 हजार 713 अर्ज आले. सदरील परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी ‘टीसीएस’ कंपनीला परीक्षेचे कंत्राट देण्यात असून 17 ऑगस्टपासून परीक्षा देखील सुरू झाल्या. मात्र तलाठी भरती परीक्षेसंदर्भात उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तलाठी पदासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज करतांना उमेदवारांना तीन केंद्रांचे पर्याय सूचवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या आजूबाजूला जवळ असलेले परीक्षा केंद्र निवडले. सदरील परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून एक हजार तर राखीव प्रवर्गासाठी 900 रू. शुल्क आकारण्यात आले. मात्र ‘टीसीएस’ने उमेदवारांनी सुचवलेल्या परीक्षा केंद्रांचा विचार न करता त्यांना मूळ राहत असलेल्या ठिकाणांपासून 400-500 कि.मी. अंतरावर असलेल्या जिल्ह्यांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे दिली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी पत्राव्दारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उमेदवारांना अमरावती, वर्धा तसेच बीड जिल्ह्यातील उमेदवारांना नागपूर येथील परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर ते अमरावती, वर्धा अथवा बीड ते नागपूर हे अंतर जवळपास 400 ते 500 किलोमीटर असून येथील उमेदवारांना हा प्रवास करून परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यातच विद्यार्थ्यांना एक दिवस आधीच मुक्कामासाठी जावे लागणार आहे. उमेदवारांसोबत एक पालक व त्यांचा प्रवास, राहण्याचा खर्च, परीक्षा शुल्क आदींचा विचार केला तर एका उमेदवाराला जवळपास 8 ते 10 हजारांचा आर्थिक भुर्दंड बसणार असल्याचे देखील आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

अगोदरच परीक्षेसाठी आकारलेले भरमसाठ शुल्क, त्यानंतर 400-500 किलोमीटर अंतरावरचे देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांमुळे सुशिक्षीत तरूणांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे तलाठी पदभरती करिता उमेदवारांनी जी परीक्षा केंद्र सूचवली होती तीच त्यांना प्राधान्याने देण्यात यावी अथवा उमेदवारांची ‘हॉल तिकीट’ पाहून त्यांना परीक्षेच्या ठिकाणी जाण्यासाठी बसचा प्रवास मोफत करण्यात यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.