संकटांचे स्वागत केल्याशिवाय यश प्राप्ती नाही – बनसोडे

ऐईवीपीएम वुमन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर,२२ ऑगस्ट /प्रतिनिधी :- संधी दार ठोठावत असते. अनेकदा ती संधी संकटांच्या स्वरूपातही येते. या संकटांचे स्वागत करायलाच हवे. त्यातून संधी निर्माण होतात अन यश प्राप्त होते. संकटांचे स्वागत केल्याशिवाय यश प्राप्ती नाही असे मत एसएनडीटी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. साईनाथ बनसोडे यांनी व्यक्त केले. शहराच्या सिडको एन-१ भागातील ऐईवीपीएम वुमन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बनसोडे बोलत होते.

संधीच्या रूपाने अनेकदा संकटे चालून येतात. ते आपले दार ठोठावतात. आपण दार उघडले नाही तर दोन-तीन वेळेला आलेली संधी परत येत नाही असे मत डॉ. साईनाथ बनसोडे यांनी व्यक्त केले. गरुडझेप वास्तवात माणूस घेऊ शकत नाही. मात्र गरुडाची पिल्ले उंच ठिकाणी नेऊन त्याची आई आपल्या पंज्यातून सोडून देते. जमिनीवर कोसळू या भीतीने ते पिल्लू पंख उघडून भरारी घेऊ लागते. हेच आपल्याला आपल्या आयुष्यात करायचे आहे. आजच्या घडीला मुले मोबाइल आणि तंत्रज्ञानाच्या आहारी चालली आहेत. मैदानावर येऊन खेळ खेळले तर शरीर स्वस्थ राहणार असायचे त्यांनी यावेळी सांगितले. 

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एन-१ सिडको येथील ऐईवीपीएम वुमन्स कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. एसएनडीटी महिला विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.साईनाथ बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमात प्रवीण मिळणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या ७६ गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटनमंत्री श्री.देवदत्त जोशी, एसएनडीटी महिला विद्यापीठच्या सिनेट सदस्या प्रा.रावी मोरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य श्री.मनोज शेवाळे, संस्थेचे सचिव पंकज भारसाखळे, विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रांताचे संघटनमंत्री श्री.सिद्धेश्वर लटपटे, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.केजल भारसाखळे, प्राचार्य डॉ.मिलिंद उबाळे, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.