“…तर त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीसांसारखी होईल”, शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र

छत्रपती संभाजीनगर,१६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देखील मी पुन्हा येईन.. असा विश्वास व्यक्त केला. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईत होणाऱ्या इंडिया बैठकीबाबतही माहिती दिली. पंतप्रधान मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, “मोदी सरकारला देशाचे चित्र काही अनुकुल दिसत नाही, त्यामुळे मी पुन्हा येईन असं कितीही सांगितलं तरी त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल.”

यावेळी बोलताना पवारांनी मणिपूर मुद्याला देखील हात घातला. मणिपूरजवळ चीन आहे, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घडणाऱ्या सर्व गोष्टी या देशाच्या दृष्टीने घातक आहेत. गेल्या ९० दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. पंतप्रधान अविश्वास ठरावाच्या दिवशी मणिपूरवर २ मिनिटं बोलले. तर इतर विषयांवर २ तास बोलले. मणिपूरमध्ये जाऊन तेथील लोकांना विश्वास द्यावा, हे त्यांना वाटलं नाही. त्यांनी निवडणुकीच्या तयारीची मीटिंग घेणं महत्वाचं वाटलं. मणिपूरमध्ये स्त्रियांची धिंड काढली जाते आणि मोदी सरकार पाहतेय. म्हणून जनमत मोदी सरकार विरोधात करायची इंडियाची भूमिका आहे. असं पवार म्हणाले.

दिल्लीतील भाषणात त्यांनी मणिपूर घटनेवर बोलण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घेऊन मी पुन्हा येईल म्हणाले. फडणवीस आले मात्र कसे? त्यामुळे आता हे कसे येतात ते बघावं लागेल. असो, आम्ही संघर्ष करु आणि मजबुतीने उभं राहू. जनमत तयार करुन यांना धडा शिकवू, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मी राज्यात फिरतोय, लोकांचं समर्थन मिळत असून लोक पाठिंबा देत आहेत. सांगोल्यात हजारो लोकांनी माझी गाडी अडवली. अनेक ठिकाणी लोकं पुढे येवून समर्थन देत आहेत. आनंद आहे…. बीडच्या सभेनंतर काही दिवसानंतर पुन्हा बाहेर पडणार आहे, असं देखील शरद पवार म्हणाले.

शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले :

आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे, ती भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी व राज्यकर्ते यांची भूमिका देशातील सर्व समाजांमध्ये एकवाक्यता ठेवण्यासाठी अपेक्षित होती. त्याऐवजी समाजामध्ये, धर्मामध्ये व विविध भाषिकांमध्ये विभाजन कसं होईल, कटुता कशी वाढेल यासंबंधीची भूमिका ते घेत आहेत. यासाठी आम्ही देशपातळीवर इंडियाची स्थापना केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे इंडियाची बैठक व दुसऱ्या दिवशी ०१ सप्टेंबर रोजी सभा घेतली जाईल. यामाध्यमातून मोदी सरकारविरुद्ध जनमत कसा तयार करू शकतो आणि पर्याय कसा देऊ शकतो याचा विचार केला जाईल.

समाजामध्ये जातीय तणाव कसं वाढेल याची काळजी आज मोदी सरकार घेतंय हि गोष्ट चिंताजनक आहे. अनेक निर्णय ते असे घेतात कि त्यामुळे कटुता वाढते सामाजिक अंतर वाढतं. स्वातंत्र्यानंतर देशाचे दोन भाग झाले. दोन समाजामध्ये अंतर वाढले, एकमेकांवर हल्ले झाले. काही लोकं जखमी तर काही मृत्यमुखी पडले. त्याच्यातून जी कटुता निर्माण झाली, हे सर्व समाज विसरायला लागलाय अश्यावेळेला १० तारखेला केंद्रानी सर्क्युलर काढलंय हा पार्टीशन फाळणी झाली. आणि ते करत असताना त्यांनी सांगितलं की त्या सबंध फाळणीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याचं प्रदर्शन हे ठीकठिकाणी केलं पाहिजे. यानंतर त्याचं महत्व लोकांना कळावं म्हणून फंक्शन घ्या. त्याच्यातून हे प्रदर्शन अधिक लोकांपर्यंत जाईल कसा याची काळजी घ्या. त्याकाळातील काही स्वातंत्र्यसेनानी आणि ज्यांना या जुन्या काळातील माहिती आहे अश्या लोकांना कटाक्षाने निमंत्रित करणे आणि त्याठिकाणी मिडीयालादेखील निमंत्रित करून हा सर्व हॉरर इतिहास त्यांच्यासमोर ठेवा. अश्याप्रकारचं सर्क्युलर १०/०८/२०२३ रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंत्रालयाने काढलं.

याचा अर्थ स्पष्ट होतो, जे आम्ही सातत्याने सांगतोय कि हे सरकार समाजामध्ये कटुता वाढवतंय, जाती- धर्मामध्ये व भाषिकांमध्ये अंतर वाढवतंय आणि देशाचं ऐक्याचं वातावरण बिघडवतंय. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असो, कॉंग्रेस पक्ष असो व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष असो. इंडियाच्या बैठकीमध्ये आम्ही हा प्रस्ताव त्याठिकाणी मांडू आणि इंडियाचे जे सर्व सभासद आहेत त्या सर्वांना याचं गांभीर्य लक्षात आणून देऊ. त्यांच्या राज्यामध्येसुद्धा याच्याबद्दलचा एक आक्रमक भूमिका विशद करण्याचा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. गोवा, मध्यप्रदेश व महाराष्ट्र अश्या अनेक राज्यातील प्रस्थापित लोकांनी निवडून दिलेलं सरकार पाडण्याचा कार्यक्रम मोदींच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने केलं. देशाच्या नॉर्थ इस्ट भागामध्ये ज्या गोष्टी घडवल्या जात आहेत त्या देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत. त्याचं ज्वलंत उदाहरण मणिपूर आहे. अविश्वासाच्या ठरावावर उत्तर देताना मोदी मणिपूरवर ४-५ मिनिटे बोलले व बाकीचे पावणे दोन तास विरोधकांवर बोलले. मणिपूरच्या लोकांना विश्वास देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी तिथे जावं ही आमची मागणी होती. पण त्यांना मध्यप्रदेश किंवा अन्य ठिकाणी निवडणुकीच्या तयारीची सभा घेणं अधिक महत्वाचं वाटलं. आज तिथे आग लागली आहे, एकमेकांवर हल्ले होत आहेत, स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे उडाले आहेत. या सर्वांवर मोदी सरकारची बघ्याची भूमिका आहे.

असे असताना अपेक्षा होती कि १५ ऑगस्टच्या भाषणामध्ये प्रधानमंत्री या सर्व गोष्टींचा उल्लेख करतील. आज विरोधकांकडे एका वेगळ्या दृष्टीने बघणं त्यांना यातना कश्या देता येतील याची खबरदारी आजचा सत्ताधारी पक्ष करतोय. त्याची चिंता न करता आम्ही संघर्ष करू. हे जे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावरती जनमत तयार करून त्यांना लोकशाही पद्धतीने धडा शिकवू हा कार्यक्रम हातामध्ये घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहे. काँग्रेस आणि शिवसेनेविषयीची चर्चा म्हणजे वस्तुस्थिती नाही आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही.

अलीकडे राज्यात एक नवीन गोष्ट लक्षात आली कि राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता यांच्यापेक्षा एक प्रभावी शक्ती निर्णय घेते ती म्हणजे “ईडी” कुणाच्या बाबतीत कधी काय निर्णय घेईल याची माहिती नाही.

राज्यात पाऊस कमी झाला आहे तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी लोकांनी दुबार पेरणी केली आहे. केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना या संकटातून मुक्त केलं पाहिजे. निवडणूक आयोगाने आम्हाल विचारलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तर दिलं. आज हा प्रश्न आम्हाला काळजी करण्यासारखा आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांचा स्वतःचा असेल तर त्याची मला चिंता नाही. परंतु मला असं दिसतंय शिवसेनेचा जो निर्णय झाला (उ.बा.ठा.) त्याच्यामध्ये असं लक्षात आलं कि केंद्र शासनातील काही शक्तिशाली घटकांनी त्याठिकाणी हस्तक्षेप केला. आणि त्याचा परिणाम आज त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर झाला. तोच प्रयोग आमच्यावर करण्याची पाउले टाकलेली दिसत आहेत. अजून झाली असं मी म्हणत नाही. पण ज्या पद्धतीच्या मागण्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. त्याचा खुलासा मला निवडणूक आयोगाने मागितलेला आहे. ते बघितल्यानंतर निश्चित आम्हाला त्याची काळजी वाटते. चिन्हाची चिंता मी कधी करत नाही. परंतु आज केंद्र शासन आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राजकीय पक्षांना अडचणीत आणण्याचा काम करत आहेत. ज्यावेळेला आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री होते त्यावेळेला असं केलं जातं. मला आता देशाचं चित्र मोदी सरकारला अनुकूल असं दिसत नाही. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, उडीसा व झारखंड याठिकाणी भाजपाची सत्ता नाही. म्हणजेच निवडणुकीच्या पूर्वीच लोकांनी यांची विल्लेवाट कशी करायची याचा विचार केलेला दिसतोय.

भाजपाची भूमिका घेणारे जे आहेत ते आमचे नाहीत, राहणार नाहीत व उद्याही राहणार नाहीत. इंडिया म्हणून आम्ही एकत्रितपणे लोकांपुढे जाणार आहोत. महाराष्ट्राच्या तरुणांनी कोणत्या रस्त्याला जायचं ते ठरवलं आहे या निवडणुकीत ते त्यांचा निकाल देतील. महाराष्ट्राच्या जनतेवर आणि तरुण पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे. २०२४ ला राज्यातलं व देशातलं चित्र बदललं पाहिजे त्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही अखंड करू. माझी चर्चा करून राजकीय निर्णय घेण्याची स्थिती अजून आलेली नाही. आम्ही मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. आम्हाला या देशात बदल हवा आहे.