वैयक्तिक नळजोडणीबाबत कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही-विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड

विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांच्याकडून जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आढावा

छत्रपती संभाजीनगर,१० ऑगस्ट  /प्रतिनिधी :-  विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी जलजीवन मिशन योजने अंतर्गत मराठवाडा विभागातील कामांचा आढावा घेतला. औरंगाबाद विभागात 29 लाख 73 हजार 215 कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणीव्दारे प्रती माणसी प्रती दिन 55 लीटर प्रमाणे शुदध व गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याबाबत निश्चित केले आहे. त्यापैकी 22 लाख 15 हजार 994 कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. वैयक्तिक नळजोडणी बाबत जिल्हयांना देण्यात आलेले उदीष्ट विहित कालावधीत पुर्ण न केल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबत कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी सबंधित यंत्रणेला दिला.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्री. राजेअर्दड यांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी मजिप्राचे सहायक उपमुख्य अभियंता एम.बी. पतंगे, उप अभियंता अजय जगताप, विकास शाखचे उपायुक्त सुरेश वेदमुथा, सहायक आयुक्त राजेंद्र अहिरे यांच्यासह विभागातील आठही जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता, तांत्रिक सल्लागार उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री राजेअर्दड म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या सर्व योजनांची कामे विहित काल मर्यादेत पुर्ण करताना कामाची गुणवत्ता व गती या दोन्ही बाबींचे पालन अत्यंत आवश्यक आहे. विभागातील ज्या जिल्हयात कामाची गती कमी आहे, त्या जिल्हयांनी कामाबाबतचे नियोजन करून इतर जिल्हयांप्रमाणे काम गतीने पुर्ण करावे. लातूर जिल्हयाने चांगले नियोजन केले असल्याचा उल्लेख करून विभागातील इतर जिल्हयांतील यंत्रणेने याबाबत माहिती घेवून आपल्या जिल्हयातही कामाला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जलजीवन मिशन अंतर्गत योजनेच्या कामात येणाऱ्या विविध तक्रारीमध्ये शासनाने नेमून दिलेल्या तांत्रिक सल्लागार संस्थांनी कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासावी. तांत्रिक सल्लागारांचा याबाबतचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जलजीवन मिशन योजनेच्या कामाला गती देण्यासाठी सबंधित जिल्हाधिकारी यांनी महिन्यातून किमान एक बैठक तसेच सबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिन्यातून किमान दोन बैठका घेण्याबाबतही विभागीय आयुक्त श्री राजेअर्दड यांनी यंत्रणेला सूचना दिल्या.

छत्रपती संभाजीनगर विभागात जलजीवन मिशन योजने अंतर्गत सर्व योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत,अशी माहिती विभागातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.