राहुल गांधींचे संसद सदस्यत्व बहाल

अपात्र लोकसभा सदस्य ते लोकसभा सदस्य राहुल गांधी यांचा प्रवास ट्वीटवर हँडलवर करून घेतला बदल

नवी दिल्ली,७ ऑगस्ट/प्रतिनिधीः- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्वीटर) ‘अपात्र संसद सदस्य’ शब्द काढून टाकून ‘संसद सदस्य’ असा बदल करून घेतला. गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व सोमवारी पूर्ववत केले गेल्यावर हा बदल करण्यात आला.

तत्पूर्वी, लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार राहुल गांधी यांची अपात्रता (जी २४ मार्च, २०२३ रोजी जाहीर केली गेली होती) मागे घेण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या संसद सदस्यांनी गांधी यांचे संसदेत घोषणा देत स्वागत केले व मिठाई वाटली. राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून अपात्र हा शब्द काढून टाकून संसद सदस्य असे तेथे टाकले. राहुल गांधी यांचे सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी त्यांच्या तुरूंगवासाच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे पुन्हा बहाल झाल्यावर सोमवारी लोकसभेत काँग्रेस सदस्यांनी केलेल्या स्वागताच्या घोषणांत त्यांचे आगमन झाले.

image.png

प्रथम गांधी संसदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी गेले व त्यांनी तेथे अभिवादन करून लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी संसद इमारतीत प्रवेश केला.

दरम्यान, राहुल गांधी यांचे संसदेत पुनरागमन झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ पक्ष सदस्यांनी मिठाई वाटली. मोदी आडनावाचा अशिष्ट उल्लेख केल्याच्या प्रकरणात राहुल गांधी यांना सूरच्या सत्र न्यायालयाने २३ मार्च, २०२३ रोजी दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने २४ मार्च रोजी रद्द केले. यामुळे गांधी यांनी २२ एप्रिल रोजी त्यांचे अधिकृत निवासस्थानही रिकामे केले. गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने ४ ऑगस्ट रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. मोदी आडनावावरून झालेल्या बदनामीच्या खटल्यात गांधी यांना जास्तीतजास्त दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा का दिली याची कारणे कनिष्ठ (सूरत सत्र न्यायालय) न्यायालयाने दिली नाहीत, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली.

लोकसभेचे घोषणांच्या साथीने

राहुल गांधी यांचे आगमन

राहुल गांधी यांचे लोकसभेत आगमन झाले ते त्यांची आई सोनिया गांधी व पक्षाच्या संसद सदस्यांसह. राहुल गांधी दुपारी १२ च्या आधी बराच वेळ लोकसभा चेंबरमध्ये आले होते. त्याच्या आधीच सभागृहाचे कामकाज तहकूब झालेले होते. सभागृहातील गांधी यांचा प्रवेश हा काँग्रेसच्या  नेत्यांनी घोषणा देत झाला. या घोषणा होत्या “जोडो जोडो भारत जोडो!” गांधी हे त्यांच्या जागेवर बसताच सोनिया गांधी यांनी त्यांचे चुंबन घेतले. विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनीही त्यांचे त्यांच्या जागेवर जाऊन अभिनंदन केले. त्यात बहुजन समाज पक्षाचे दानिश अली यांचाही समावेश होता. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, द्रमुक, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही गांधी यांचे जागेवर जाऊन स्वागत व अभिनंदन केले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच भाजपचे निशिकांत दुबे यांनी वृत्तपत्राच्या एका संघटनेला चीनकडून मदत मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. दुबे यांनी यासाठी एका बातमीचा आधार घेतला होता. यावेळी भाजपच्या सदस्यांनी “काँग्रेस चीन भाई भाई” अशा घोषणा दिल्या. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले होते. अध्यक्षस्थानी किरीट सोळंकी होते. त्यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले.

कोट्यवधी देशबांधवांचे मनःपूर्नक आभार -प्रियांका गांधी

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल झाल्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांच्या सत्य आणि न्यायाच्या संघर्षात साथ दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. संसदेत आता खऱ्या प्रश्नांवरील आवाज पुन्हा घुमू लागेल, असेही गांधी म्हणाल्या.

“लोकांच्या खऱ्या खुऱ्या प्रश्नांचा आवाज आता संसदेत पुन्हा एकदा ऐकू येईल,” असे गांधी ट्वीटरवर म्हणाल्या. त्यासोबत त्यांनी राहुल गांधी यांचे काँग्रेसचे सदस्य व इंडिया ब्लॉकचे नेते घोषणा देत असताना संसदेत आगमन झाले तेव्हाचा व्हिडीओ जोडला आहे. “राहुल गांधीजी यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या काँग्रेसच्या लक्षावधी कार्यकर्त्यांचे आणि न्याय आणि सत्यासाठीच्या संघर्षात साथ दिलेल्या कोट्यावधी देशबांधवांचे मनःपूर्वक आभार,” असे प्रियांका गांधी म्हणाल्य.

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व सोमवारी पुन्हा बहाल झाल्यावर प्रियांका गांधी यांनी वरील भावना व्यक्त केल्या.