मुंबईत तीन दहशतवादी घुसले!

मुंबई,८  एप्रिल / प्रतिनिधी :-  एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिस कंट्रोलला ७ एप्रिल रोजी फोन केला आणि दुबईहून तीन दहशतवादी मुंबईत आले असल्याची माहिती दिली. तसेच या दहशतवाद्यांचे कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचे सांगत फोन करणार्‍याने पोलिसांना मुजीब सय्यदचे नाव सांगितले आणि त्याचा मोबाईल नंबर आणि वाहन क्रमांकही पोलिसांना दिला. ही सर्व माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव राजा ठोंगे असे सांगण्यात आले आहे. या कॉलनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

गेल्या महिन्यात १ मार्च रोजी रात्री ११ वाजता एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन करून मुंबईतील कुर्ला येथे १० मिनिटांत कुर्ल्यात स्फोट होणार असल्याचे सांगून कॉल डिस्कनेक्ट केला होता. त्यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता तपासासाठी एक पथक तयार केले होते. मात्र, तासाभराच्या तपासानंतरही पोलिसांना तेथून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
 
या सर्व प्रकारामुळे पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून परिसरात तपास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ही माहिती चुकीची असल्याचे आढळून आल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा विनोद आढळल्यास फोन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. यापूर्वी नागपुरातील दोन रुग्णालये, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि मानकापूरच्या मेंटल रुग्णालयालाही गेल्या महिन्यात बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.