आयसीआयसीआय-व्हिडिओकॉन कर्ज फसवणूकःकोचर पती-पत्नी व वेणूगोपाल धूत यांच्यावर सीबीआयचे आरोपपत्र

मुंबई,८  एप्रिल / प्रतिनिधी :-  ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर कर्ज फसवणूक प्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या ‘सीबीआय’ने कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि ‘व्हिडिओकॉन’चे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अन्य सहा जणांची नावे आहेत.

‘व्हिडीओकॉन’चे वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत गुंतवणूक केली होती, असे या प्रकरणाचा तपास करणार्‍या ‘सीबीआय’चे म्हणणे आहे. त्या बदल्यात चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरफायदा करत ‘व्हिडिओकॉन’ ग्रुपच्या कंपन्यांना बेकायदेशीरपणे कर्ज दिले होते, असा आरोप कोचर दाम्पत्यावर करण्यात आला आहे.कोचर आणि धूत यांच्याशिवाय ‘सीबीआय’च्या आरोपपत्रात ‘चार्टर्ड अकाउंटंट’ आणि धूत यांच्या नातेवाईकाचीही नावे आहेत. माध्यमांकडे आलेल्या वृत्तानुसार, ‘सीबीआय’ने आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात सादर केले आहे. त्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

३ महिन्यांपूर्वीच अटक

कर्ज फसवणूक प्रकरणी ‘सीबीआय’ने कोचर दाम्पत्याला गेल्यावर्षी २३ डिसेंबर रोजी अटक केली होती. तर धूत यांना तीन दिवसांनी अटक करण्यात आली. या प्रकरणी पहिली ‘एफआयआर’ २०१९ मध्ये नोंदवण्यात आली होती. ‘व्हिडिओकॉन’ समूहाला ३ हजार, २५० कोटी रुपयांपेक्षा कर्जाच्या वाटपाशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यांच्या अटकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने कोचर यांची ९ जानेवारीला तर धूत यांची २० जानेवारीला जामिनावर सुटका केली होती.

दरम्यान, २०१२ मध्ये, चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ‘आयसीआयसीआय’ बँकेने ‘व्हिडिओकॉन’ समूहाला ३ हजार, २५० कोटींचे कर्ज दिले आणि सहा महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने ‘मेसर्स न्यूपॉवर रिन्युएबल्स’ला ६४ कोटींचे कर्ज दिले. ज्यात दीपक कोचर यांचा ५० टक्के हिस्सा आहे.‘आयसीआयसीआय’ बँकेकडून देण्यात आलेले हे कर्जनंतर ‘एनपीए’ झाले आणि नंतर या प्रकरणाला ‘बँक फ्रॉड’ असे म्हटले गेले. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने दीपक कोचर यांना अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास करण्यात येत असून, या संपूर्ण घटनेची चौकशी झाल्यावर दोषींवर कारवाई करण्यात येणार असून, यात आणखीही काहीजण सामील असल्याचे म्हटले जात आहे.