धनादेश अनादरप्रकरणी एक वर्षाची शिक्षा ; वैजापूर कोर्टाचा निकाल

वैजापूर ,१ एप्रिल  / प्रतिनिधी :- येथील वैजापूर नागरी सहकारी पतसंस्थेकडुन घेतलेले वैयक्तिक कर्ज परत करण्यासाठी पतसंस्थेला दिलेला धनादेश वटला नाही. याप्रकरणी न्यायालयाने राजु छबुराव इंगळे (दुर्गावाडी, वैजापूर) यास एक वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.‌ तसेच तक्रारदार पतसंस्थेस एक लाख १६ हजार ६२२ रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याप्रकरणाची अधिक माहिती अशी की, वैजापूर शहरातील दुर्गावाडी भागात राहणारा राजु इंगळे याने फेब्रुवारी २०१८ मध्ये वैजापूर नागरी सहकारी पतसंस्थेकडुन एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्यांनी हे कर्ज ठराविक मुदतीत पतसंस्थेला परत केले नाही. म्हणून पतसंस्थेने इंगळे यास थबबाकीसह असलेली रक्कम एक लाख १६ हजार ६२२ रुपये परत करण्यास सांगितले.‌ 

ही रक्कम परत करण्याच्या उद्देशाने इंगळे याने पतसंस्थेला वैजापूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा चार जानेवारी २०१९ या तारखेचा चेक (धनादेश) पतसंस्थेस दिला.  वैजापूर नागरी सहकारी पतसंस्थेने हा धनादेश वटवण्यासाठी लोकविकास नागरी सहकारी बॅंकेच्या वैजापूर शाखेत जमा केला. मात्र संबंधित खात्यात रक्कम नसल्याने हा धनादेश अनादरीत होऊन मेमोसह पतसंस्थेकडे परत आला. त्यामुळे पतसंस्थेने याबाबत इंगळे यास नोटिसीद्वारे कळवुन पंधरा दिवसांच्या आत सदर रक्कम जमा करण्यास सांगितले. २१ जानेवारी २०१९ ला ही नोटीस इंगळे यास मिळाली. 

याप्रकरणी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक महेश ट केळकर यांनी वैजापूर येथील न्यायालयात राजु इंगळे यांच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम १३८ नुसार ॲड. मजहर बेग यांच्या मार्फत तक्रार दाखल केली.‌ या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश डी.एम. पवार यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीच्या वेळी ॲड बेग यांनी आरोपींचा गुन्हा न्यायालयासमोर सिद्ध केला.‌ त्यामुळे दोन्ही बाजुंचे साक्षीपुरावे व युक्तीवाद ऐकुन न्यायालयाने आरोपीस राजु इंगळे यास दोषी ठरवत एक वर्षाची शिक्षा व नुकसान भरपाईची रक्कम एका महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले. तसेच ही रक्कम न दिल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.