लातूर रेल्वे स्टेशन होणार स्मार्ट ; पुनर्विकासासाठी 19.10 कोटी

खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत झाला लातूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी

लातूर,६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील 508 रेल्वे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. यामध्ये लातूर रेल्वे स्थानकाचाही समावेश असून यासाठी 19.10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांशी संवाद साधला.

लातूरचे खा.सुधाकर श्रृंगारे, आमदार रमेश कराड, माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर – घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वित्त अधिकारी विवेक होके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मागील नऊ वर्षांमध्ये लातूर रेल्वे स्थानकावरून अनेक नव्या रेल्वे गाड्या सुरु झाल्या. त्यामुळे शिक्षण आणि कृषि उद्योगात आघाडीवर असलेल्या लातूर जिल्ह्यातील नागरिकांना प्रवास करणे अत्यंत सुलभ झाले. ‘वंदे भारत’ या अत्याधुनिक रेल्वेच्या कोचची फॅक्टरी लातूरमध्ये सुरु होत असल्यामुळे स्थानिक रोजगार निर्माण होण्याची संधी निर्माण झाल्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी सांगितले. 19 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी खर्च होणार आहे, त्यातून लातूरला शोभेल असे स्टेशन होणार असल्याचे खासदार श्री. श्रृंगारे म्हणाले.

लातूर कोच फॅक्टरी सुरु होण्याच्या प्रक्रियेला गती आली असून सर्व तांत्रिक बाजू पूर्ण झाल्या आहेत. कोट्यावधी रुपये गुंतविले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याची माहिती माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वित्त अधिकारी विवेक होके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लातूर रेल्वे स्टेशनमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती त्यांनी दिली.

रेल्वेकडून लातूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्याचे बक्षीस वितरण यावेळी खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

लातूर रेल्वे स्टेशनचा पुनर्विकासात करण्यात येणारी कामे

▪️स्थानक परिसरातील परिभ्रमण क्षेत्र विकास

▪️सुनियोजित आणि उत्तम पार्किंग व्यवस्था व पदपथ

▪️निसर्गरम्य गार्डन

▪️स्टेशन कार्यालयाचे व परिसराचे नूतनीकरण

▪️स्थानकात प्रवेश करण्यासाठी उचित योग्य दरवाजे, मार्गिका, आकर्षक असे उंच मुख्य दर्शनी भाग

▪️१२ मीटर रुंद पादचारी पूल

▪️स्थानकाच्या सभोवतालची व दर्शनी भागाची रोषणाई

▪️साइनेज बोर्डचे अपग्रेडेशन

▪️स्थानकाच्या आतील व बाहेरील उत्तम दर्जाचे रंगित डिस्प्ले बोर्डाची तरतूद

▪️टॉवर घड्याळ जीपीएस आधारित

▪️स्टेशन इमारतीच्या नूतनीकरणामध्ये सुधारित शौचालये/ स्वछतागृहे, जलनि:सारणाची कामे, उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मवरील छत, संकेत फलक, कोच इंडिकेटर, सरकते जिने, उद्वाहक (लिफ्ट) आणि विविध प्रकारच्या विद्युत कामांचा समावेश आहे.