नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा; गरबा, दांडिया यासह नवरात्रातील कार्यक्रमांबाबत शासकीय सूचनांचे पालन करा – धनंजय मुंडे

नवरात्रोत्सवाच्या प्रारंभानिमित्त दिल्या बीड जिल्हावासीयांना शुभेच्छा

बीड दि. १६ – : बीड जिल्ह्यासह राज्य व देशभरात उद्यापासून नवरात्रोत्सव आरंभ होत असून, कोरोनाच्या वाढत्या आकडेवाऱ्या लक्ष्यात घेत या नवरात्रोत्सवात घटस्थापना, देवी आदिशक्तीची स्थापना, गरबा, दांडिया यासह अन्य उपक्रम व सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत. विविध मंडळांनी शासकीय सुचनांचे पालन करून अधिकृत परवानगी घेऊनच देवी स्थापना करावी व साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करावा असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

नवरात्रोत्सव प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.

बीड जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत विशेष नियमावली घोषित केली आहे, त्या नियमावलीचे काटेकोर पालन करत, देवी स्थापना तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या आदिशक्तीच्या मंदिरातील नवरात्रोत्सव नागरिकांना फेसबुक, स्थानिक केबल नेटवर्क यांसह विविध माध्यमातून पाहण्याची व दर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी व प्रत्यक्ष ठिकाणी गर्दी टाळावी असे यानिमित्ताने मुंडे यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या कठीण काळात एकीकडे सर्वधर्मीय सण – उत्सवांना खिळ बसलेली असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यासह मराठवाड्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपले आहे; अशा परिस्थितीत राज्य सरकार म्हणून तसेच जिल्ह्याचा एक नागरिक व लोकप्रतिनिधी या नात्याने आपण पूर्णवेळ जागरूक असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी मुंडे यांनी अधोरेखित केले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा व शासकीय नियमावली व सूचनांचे पालन करावे असे आवाहनही केले आहे.