निलंगा उपजिल्हा रूग्णालय ‘व्हेंटिलेटरवर

डॉ. दिनकर पाटील यांचे निलंबन, तज्ञ डाॕक्टर नसल्यामुळे 63 रूग्णाचा जीव  टांगणीला

निलंगा ,३० एप्रिल /प्रतिनिधी 

उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय  आधिकारी डॉ. दिनकर पाटील यांना जिल्हाधिकारी लातूर  यांनी तडकाफडकी निलंबित करण्याचा आदेश दिल्यामुळे  व्हेंटिलेटर हाताळणारे तज्ञ डॉक्टर   नसल्याने उपजिल्हा रूग्णालयातील आॕक्सिजनवरती व व्हेंटिलेटर वर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा   उपचाराचा  प्रश्न गंभीर  झाला आहे. तज्ञ डॉक्टरर्स व नर्स स्टापच्या कमतरतेमुळे निलंग्याचे उपजिल्हा रूग्णालय ‘व्हेंटीलेटवर’ आले आहे. 

एका रुग्णाच्या तक्रारी वरुन  तहसीलदारांनी  एका मेडिकल वर टाकलेल्या छाप्यानंतर तहसीलदार गणेश जाधव यांनी दिलेल्या अहवालावरून उपजिल्हारुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्याचा आदेश  जिल्हाधिकारी लातूर यांनी दिला. . प्रशासनाकडून घाईघाईने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे  उपजिल्हा रूग्णालयातून मृत्यूच्या दाढेतून प्राण वाचलेल्या रूग्णाकडून संताप व्यक्त करण्यात येत असून  आहे. वैद्यकिय आधिकारी डॉ. दिनकर पाटील यांनी अहोरात्र कर्तव्य बजावून अनेकांचे प्राण वाचवले असल्याने त्यांचे निलंबन रद्द करावी अशी मागणी उपचार घेवून बरे झालेल्या कोरणा बधित रुग्णांकडून करण्यात येत आहे.  कोरोना संसर्गासारख्या आपत्तीच्या काळात डॉक्टर कमी पडत आहेत.

शासनाच्या निकषाप्रमाणे एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्यामुळे निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात सहा डेंटल डॉक्टर भर्ती करून सेवा देणे सुरू आहे. शिवाय येथे रूग्णाची संख्या अधिक असल्यामुळे 17 नर्स कमी पडत आहे. अतिरीक्त ताण येथील डॉक्टर व स्टापवरती पडत आहे. त्यामुळे सध्या रूग्णाचा जिव वाचणे महत्त्वाचे आहे. कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी घाई केली असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे.  प्रशासनाने तक्रारी बाबतीत अधिक चौकशी न करता व दुसरी बाजू न ऐकता एकतर्फी निर्णय घेतल्याने रुग्ण व नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. झालेले निलंबन त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

 येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या 91 रूग्ण असून त्यापैकी 63 रुग्ण आॕक्सिजनवरती आहेत. पाच रूग्ण व्हेंटीलेटरवरती आहेत. आॕक्सिजन व व्हेंटीलेटरवर हताळण्यास तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे रूग्णाचे नातेवाईक चिंतीत असून रूग्णाचे कांही बरेवाईट झाले तर या प्रकाराला जिम्मेदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना व्हेंटिलेटर ऑपरेट करता येत नाही. अश्यातच नवीन रुग्ण व्हेंटिलेटरवर घेण्याची गरज पडली तर करायचे काय असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.

ना..नोटीस…ना..मेमो.. थेट निलंबन

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय आधिकारी डॉ. दिनकर पाटील यांना निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांचे न ऐकणे, शासकीय आधिकारी यांच्यासोबत अशोभनीय वर्तन करणे आदीचा ठपका ठेवण्यात आला असून याबाबत संबंधित डॉक्टर बद्दल यापूर्वी कोणतीच तक्रार नाही व  अशा प्रकाराबद्दल निलंबित डॉक्टरांना साधी कारणे दाखवा नोटीसही दिली नाही. अथवा त्यांचे म्हणणे मांडायला संधी दिली नाही थेट निलंबन केल्यामुळे रूग्णातून रोष व्यक्त केला जात आहे.