अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून रेल्वे विकासकामाद्वारे नांदेड जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या संधी

▪️रेल्वे विकासाचे अनुशेष पूर्ण करू

▪️मुदखेड, किनवट रेल्वे स्थानकाचा होणार विकास

▪️नांदेड येथून तिरुपतीसाठी दररोज असेल गाडी

नांदेड ,६ ऑगस्ट /प्रतिनिधी :-मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी अनेक वर्ष वाट पहावी लागली. संघर्ष करावा लागला. आता स्थिती बदलते आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या नांदेड भेटीत विकासाचा अनुशेष आम्ही दूर करू असे सुतोवाच केले होते. त्याची प्रचिती अवघ्या काही दिवसात आली असून देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या विकासात मराठवाड्यातील जालना, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, बीड(परळी) सह नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, किनवट हे रेल्वे स्थानक आधुनिक रूप घेत असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत संपूर्ण देशभातील ५०८ रेल्वे स्थानकाच्या कामाचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन झाला.

या ५०८ रेल्वे स्थानकात समावेश असलेल्या मुदखेड, किनवट रेल्वे स्थानक विकास कामाचा स्थानिक प्रातिनिधिक भूमीपूजन समारंभ मुदखेड येथे आयोजित केला होता. यात ते बोलत होते.

यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, दिलीप ठाकूर,बाळू खोमणे, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण गायकवाड, शंकर मुतकलवाड, मुन्ना चांडक आदींसह कार्यकर्ते, व्यापारी,शालेय विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.

महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांच्या या पुनर्विकास योजनेत नांदेड विभागातील मुदखेड आणि किनवट रेल्वे स्थानकांची पहिल्या यादीत निवड झाली असून मुदखेडला २३ कोटी १० लाख रुपये v किनवट येथे २३ कोटी खर्च करून अद्ययावत रेल्वे स्थानक करण्यात येणार असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. या विकास प्रकलपात रेल्वे ईमारत, पार्कींग व्यवस्था, मोठे व दर्जेदार प्रतिक्षालय , लिफ्ट,एस्केलेटर, पादचारी पुल,व्हीआयपी कक्ष आदींसह स्टेशनचे पूर्ण रुपडे बदलणार असून लवकरच अजून रेल्वेच्या गाड्यांमध्ये वाढ केळी जात असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे विद्युतीकरण प्रगतीपथावर असून नवीन वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी सयोचित भाषण केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे हे फलित-आमदार भीमराव केराम

मराठवाड्याच्या काठावर असलेल्या किनवट रेल्वे स्थानकाचा “अमृत भारत स्टेशन योजना” मध्ये समावेश केल्याने या भागाला नवी उपलब्धी झाली आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या स्थानकाचा कायमस्वरूपी कायापालट होणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवासी, यात्रेकरू व व्यापारी यांना मोठा लाभ होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे हे फलित असल्याचे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.

किनवट रेल्वेस्थानकात रेल्वे स्थानक पुनर्विकास पायाभरणी समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे किनवट रेल्वे स्थानकाचा “अमृत भारत स्टेशन योजना” मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी समावेश केला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी नगर परिषदेचा प्रशासक तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, नांदेडचे सिनिअर डीएमएम श्यामलाल दसमाना व मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.