येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून शिक्षक भरती प्रक्रिया-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर 

छत्रपती संभाजीनगर,२९ जुलै /प्रतिनिधी :-येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्पयात 30 हजार आणि दुसऱ्या टप्प्यात 20 हजार जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी रोस्टर क्लिअर करण्यात येत आहे. ते झाल्याशिवाय पोर्टल सुरु करता येत नाही. असेही केसरकर यांनी सांगितले.

बिंदू नामावली आणि संच मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर शिक्षक भरतीबाबतचे संकेतस्थळ सुरू होईल. ऑक्टोबर अखेर पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांना नियुक्ती आदेश दिले जातील असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. या भरतीनंतर बदलीचे धोरण बदललेले असेल. त्यानंतर शिक्षकांना दहा वर्षांपर्यंत एकाच ठिकाणी काम करावे लागणार आहे.

अगदीच अपरिहार्य स्थितीमध्ये बदली केली जाईल. अन्यथा जेथे नियुक्ती तेथेच सेवानिवृत्तीपर्यंत काम करावे लागणार आहे. असे केल्याने शिक्षकांना गुणवत्तेसाठी जबाबदार धरणे शक्य होईल, असे मत केसरकर यांनी व्यक्त केले. येथे विद्या प्राधिकरणाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

या वर्षी पहिलीपासून कृषी शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय उपक्रमात शेती शिक्षणासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम पुढील वर्षांपर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण व संस्थेकडून तयार होईल. मात्र, तोपर्यंत न थांबता अगदी पहिलीपासून हा अभ्यासक्रम शिकविणे हाती घेतले जाईल. खरे तर हा अभ्याक्रम पाचवीपासून करण्याची घोषणा माजी कृषीमंत्र्यांनी केली होती. कोणत्या वर्षांपासून शिक्षण द्यावे, हे कृषी विभागाने सांगितले तरी चालेल. मात्र, ही प्रक्रिया याच शैक्षणिक वर्षांपासून सुरू केली जाणार आहे.

कोविड नंतर शाळांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल झालेले दिसून येत आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला असून, एकटे राहणे, अचानक हिंसक वर्तन करणे असे प्रकार समोर येत आहेत. तशा घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे मोबाईल कडून मुलांना पुस्तकांकडे वळवण्यासाठी ड्राईव्ह घेणार आहोत. यासाठी बालमानसोपचार तज्ज्ञ संघटेसोबत करार करणार आहोत असेही केसरकर म्हणाले.