भाजपची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर:विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर कायम

नवी दिल्ली,२९ जुलै / प्रतिनिधी:- भाजपच्या संघटनात्मक पुनर्रचनेत आज राष्ट्रीय कार्यकारणीच्या नवी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. ही यादी पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी सकाळी जाहीर केली. या यादीत १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, सह-संघटन महासचिव, १३ राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सह-खजिनदार अशी रचना आहे.

भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकारणीत महाराष्ट्रील तिघांना पुन्हा स्थान देण्यात आलं आहे. त्यात विनोद तावडे यांना महामंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे आणि विजया राहाटकर यांच्यावर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी २ महिने राजकारणापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना पुन्हा सक्रिय होण्यास सांगितलं होतं. यानंतर आता भाजपने पंकजा यांच्या पुन्हा केंद्रीय पातळीवरची जबाबदारी टाकली आहे.

महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना महासचिवपदी कायम ठेवण्यात आले आहे. तावडे लोकसभेच्या १६५ मतदारसंघांच्या ‘प्रवासी लोकसभा’ प्रकल्पाचे समन्वयक असून त्यांच्याकडे बिहारची जबाबदारीही देण्यात आली आहे. तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय आहेत. विजया रहाटकर या सचिवपदी कायम आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पंकजा यांना सचिवपदी कायम ठेवले असून त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पंकजा मुंडेंना अभय दिल्याचे मानले जात आहे.

सामान्य कार्यकर्त्याला संधी व सन्मान फक्त भाजपमध्येच मिळू शकते…

राष्ट्रीय सचिवपदी फेरनियुक्तीनंतर विजया रहाटकर यांची पक्षाबद्दल कृतज्ञता

“भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डा जी, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शहा जी यांचे मी मनापासून आभार मानते.

छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद संपल्यापासून मी गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीमध्ये विविध स्वरूपाच्या राष्ट्रीय जबाबदाऱ्या सांभाळत आहे.  भाजप महिला मोर्चाची पहिल्यांदा राष्ट्रीय सरचिटणीस, नंतर सलग दोनदा राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपची राष्ट्रीय सचिव, दादरा नगर हवेली दीव दमणची प्रभारी,  राजस्थानसारख्या मोठ्या व महत्त्वपूर्ण राज्याची सहप्रभारी अशा विविध जबाबदाऱ्या पक्षाने माझ्यावर सोपविल्या. श्री अमित शहा व श्री जे पी नड्डा यांच्या टीममध्ये सलग दहा वर्षे काम करण्याचा मानही मला मिळाला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली पक्षाच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली. याबद्दल मी पक्षाची सदैव ऋणी राहील.

कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय पातळीवर सलग १२ वर्षे काम करण्याची संधी मिळू शकते, हे फक्त आणि फक्त भाजपमध्येच घडू शकते. माझ्यावर पक्षाने पुन्हा टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्यासाठी मी समर्पित भावनेने सदैव मेहनत करत राहीन.”

: विजया रहाटकर

(राष्ट्रीय सचिव, राजस्थान सह प्रभारी)