वैजापूर बाजार समितीच्या कांदा केंद्राच्या आवारात शेतकऱ्यांसाठी अल्पदरात भोजन व पिण्याचे पाण्याची व्यवस्था

वैजापूर,२३ जुलै /प्रतिनिधी :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा खरेदी केंद्र आवारात आता शेतमाल विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतक-यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आणि आरोग्यदायी भोजन व पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश पाटील बोरणारे व भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या संचालक मंडळाने आवारात शेतकरी भोजन केंद्र सुरु केले. या केंद्रामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहराजवळील पाच किलो मीटर अंतर वरील कांदा खरेदी केंद्रावर पिण्याचे पाणी व अन्नपदार्थाची उपलब्धता नसल्यामुळे शेतक-यांना याठिकाणी गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अडीच महिन्यापुर्वी पार पडलेल्या बाजार समिती संचालक मंडळ निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणीत शिवसेना -भाजपा युतीला बहुमत मिळाल्यास या ठिकाणी शेतक-यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार रमेश बोरणारे यांनी दिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली समितीत एकहाती सत्तेचे वर्चस्व प्राप्त केल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने अवघ्या दोन महिन्यात कांदा मार्केट परिसरात दोन हजार लिटर क्षमतेचे शुद्ध पाणी फिल्टर बसवले. तसेच ५० रुपयात शेतक-यांना दर्जेदार भोजन सुविधा सुरु केली. या भोजन केंद्रामुळे या ठिकाणी दररोज येणाऱ्या हजारो शेतकरी, हमाल, वाहन चालक तसेच व्यापारी, मजूर यांना या केंद्राचा लाभ होणार आहे.रविवारी (ता.23) आ. रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, माजी सभापती बाबासाहेब जगताप, माजी उपनगराध्यक्ष शेख अकील शेख गफूर, सभापती रामहरी जाधव, संचालक कल्याण दांगोडे, कल्याण जगताप, गणेश इंगळे, प्रवीण पवार, गोरख आहेर , रियाज शेख, प्रशांत त्रिभुवन, बद्रीनाथ गायकवाड, शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख प्रकाश मतसागर, अंबादास खोसे, प्रदीप सांळुके आदींनी भेट देऊन कांदा मार्केट मधील कामकाजाची पाहणी केली. 

शेतक-यांचा पाच किलोमीटर फेरा वाचणार

बाजार समिती आवारात शेतक-यांसाठी परवडणाऱ्या दरात भोजन व्यवस्था सुरु केल्यामुळे शेतक-यांची पाच किलोमीटर पर्यत फेरा मारण्याचा त्रास सुटला. यापुर्वी या ठिकाणी कांदा विक्रीला घेऊन येणाऱ्या शेतक-यांना जेवण व पिण्याच्या पाण्यासाठी पाच किलो मीटर अंतरा पर्यत शहर किंवा रस्त्यांच्या कडेला असलेल्या हाॅटेल मध्ये जावे लागत होते.

—————————————————

शेतक-यांना मिळेल दर्जेदार भोजन व पाणी

शेतक-यांना कांदा मार्केट आवारात प्रथमच परवडणाऱ्या दरात दर्जेदार आणि आरोग्यदायी जेवण व पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार शेतक-यांना या योजनेचा लाभ घ्यावा.

-आ.रमेश बोरणारे

—————————————————-