माजी खासदार पुंडलिकराव दानवे अनंतात विलीन

भोकरदन ,२ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- माजी खासदार पुंडलिक हरी दानवे हे अनंतात विलीन झाले असून त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार येथे मंगळवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचे निधन झाले होते.


त्यांच्यावर त्यांच्या भोकरदन तालुक्यातील मुळ गावी पिंपळगाव सुतार येथे यांच्या शेतात मंगळवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी भाजपा नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण चव्हाण, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, रामभाऊ गावंडे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह राजकीय पत्रकारिता विधिज्ञ साहित्य वैद्यकीय आदी क्षेत्रातील नामवंत सह हजारोंच्या संख्येने पुंडलिक राव दानवे व त्यांच्या परिवारावर प्रेम करणारे सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंत्यसंस्कारावेळी भाजपवाले आले पाहिजेत ही इच्छाही झाली पूर्ण

माजी आमदार चंद्रकांत दानवे व बंधू राष्ट्रवादीचे युवा नेते सुधाकर दानवे आदींनी भारतीय जनता पक्षाला सोडून ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर पुंडलिकराव दानवे यांनी वेळोवेळी भावना व्यक्त केली की, मी भारतीय जनता पक्षावर कधीही खालच्या पातळीवर टीका करणार नाही कारण ज्या पक्षाने मला दोन वेळा खासदार बनवले त्या पक्षाविरुद्ध खालच्या पातळीवर जाऊन चुकीची टीका करणे माझ्या तत्वात बसत नसून मी मेल्यानंतर माझ्या मौती वर इतर पक्ष्यां तील लोकांसोबतच भाजपवाले आले पाहिजेत ही त्यांची इच्छा आज पूर्ण झाली.

त्यांच्या अंत्यविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस यांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यां सोबतच भाजपाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार बबनराव लोणीकर ,आमदार नारायण कुचे यांच्यासह इतर भाजपाचे पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.