डॉक्टरने आपला पहिला पगार दिला गुणी व होतकरू खेळाडूसाठी क्रीडा मंडळास !

वैजापूर,२३ जुलै /प्रतिनिधी :- वैजापुर तालुक्यातील उत्कर्ष शिक्षक पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पाटील वाळुंज यांचे चिरंजीव डॉक्टर सचिन ज्ञानेश्वर वाळुंज यांचा JIPMER पुद्दूचेरी येथे एमएस साठी नंबर लागला. तेथे त्यांना चांगला पगार ही मिळू लागला. डॉ. सचिन वाळुंज यांनी आपला पहिला पगार गुणी व होतकरू खेळाडूंसाठी उत्कर्ष क्रीडा मंडळास अर्पण केला.

वैजापूर तालुक्यातील खेळाडूंसाठी उत्कर्ष क्रीडा मंडळ मार्फत खेळाचे आयोजन, मार्गदर्शन व प्रशिक्षण ही दिले जाते. या वर्षी तालुक्यातील जास्तीत जास्त  खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत जाण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने मदत निधी जमा करण्या संदर्भात संपर्क केला असता डॉक्टर सचिन वाळुंज यांनी एक लाख 51 हजार,151/- चा धनादेश देऊ केला. सदर मदत निधी डॉक्टर सचिनची लहान बहीण डॉक्टर प्रियांका हिच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष साबेर खान यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. 

या प्रसंगी उत्कर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष साबेर खान तसेच उत्कर्ष क्रीडा मंडळाचे प्रमुख आणि आदर्श शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस अंजुम पठाण, आदर्श शिक्षक समितीचे राज्य संपर्कप्रमुख  संतोष बरबंडे यांच्या उपस्थितीत उत्कर्ष क्रीडा मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षकांच्या , खेळाडूंच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. तालुक्यातील खेळाडूंसाठी तालुका क्रीडा संकुलाची मागणी आग्रहाने सर्वानुमते करण्यात आली. 

 या प्रसंगी डॉ. प्रियंका वाळुंज हिचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कर्ष पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन तथा क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, आदर्श शिक्षक समितीचे नवनिर्वाचित राज्य संपर्कप्रमुख संतोष बरबंडे यांचा ही सत्कार मा. नगराध्यक्ष  साबेर खान यांच्या हस्ते करण्यात आला.

  या बैठकीला दिनेश संख, राजेश पोंदे, कचरू होले, भीमराज धारबळे, नंदकिशोर बडग, केशव कसबेवाड, संजय नागुलवाड, संदीप कांबळे, गौतम गायकवाड, धोंडीराम थोरात, मुनवर शेख, अरबाज शेख, सोमेश्वर महेश, महेश बहिरट, गौरव गायकवाड, सर्वेश सुतवणे, शिवम शहाणे, फरदीन सय्यद आदीसह मोठ्या प्रमाणावर खेळाडू उपस्थित होते.