वैजापूर तालुक्यातील जाबरगाव येथे 25 कोटींची गुंतवणूक करून 11 एकरात खासगी बाजार समिती

दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीस सुरुवात होणार

वैजापूर,२१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंचवीस कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून अकरा एकरात खाजगी तत्वावर कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल विकसित करण्यात आले आहे. खरेदी केंद्रात दररोज 20 हजार क्विंटल शेतमाल खरेदीची क्षमता निर्माण केलेली आहे. दिवाळीचे मुहुर्तावर शेतमाल खरेदीचे नियोजन करण्यात आले असून या बाजार समितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थानिक व्यापाऱ्यांकडून किफायतशीर बाजारभाव देण्याचे प्रयत्न आहे. यामुळे नगर – नाशिक जिल्ह्यात शेतमाल विक्रीला नेण्यासाठी होणारा आर्थिक खर्च आणि वेळेची बचत होईल. तसेच स्थानिक पाचशे लोकांच्या हातांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. 

खासगी बाजार समितीचे चेअरमन शांतीलाल पहाडे

बाजाराचे वैशिष्ट्ये…. 

व्यापा-यानी खरेदी केलेला शेतमाल साठवण्यासाठी येथे पाच हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे.शेत मालाची अधिक आवक झाल्यास शेतकऱ्यांना त्यांचा माल याठिकाणी सुरक्षित ठेवता येईल. फळे व भाजीपाला या नाशवंत मालाची बाजारपेठेत आवक जास्त झाल्यास भाव कमी होतात.त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 20 ते 25 सापेक्ष आद्रतेचे कोल्ड स्टोरेजची (शितगृह) व्यवस्था येथे केलेली आहे. त्यामुळे येथे शेत माल सुस्थितीत साठवून ठेवता येणार आहे. डिजिटल वे ब्रिजच्या माध्यमातून शेतमालाचे लिलावाअगोदर अचूक वजन केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांची वजनात  फसवणूक होणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री  मालाची रक्कम त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्याची अंमलबजावणी केली जाईल.शेतकऱ्यांना व्यापा-याकडे पैशासाठी हेलपाटे मारण्याची पध्दत येथे होणार नाही. वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था असून 24 तास वीजपुरवठा उपलब्धतेची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी व अडचणीसंदर्भात शेतकऱ्यांशी नियमित संवाद साधला जाईल अशी माहिती या खासगी बाजार समितीचे चेअरमन शांतीलाल पहाडे यांनी “आज दिनांक” शी बोलताना दिली.