मणिपूर घटनेवर बोलण्यासाठी पाच मिनिटंसुद्धा दिली नसल्याचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग

मुंबई,२१ जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज दिवसभरात विधीमंडळात विविध विषयांवर चर्चा होणं अपेक्षित आहे. काल मुख्यमंत्री इर्शाळवाडी येथील दुर्घटनास्थळी असल्याने ते अधिवेशनाला उपस्थित राहु शकले नाहीत, आज मुख्यमंत्री स्वत: विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करताना दिसतील. सध्या देशात मणिपूर हिंसाचार आणि बलात्काराचं प्रकरण तापलं आहे. याचे पडसाद राज्यातही उमटताना दिसत आहेत.

मुंबई काँग्रेच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मणिपूर घटनेवर बोलण्यास पाच मिनीटं देखील वेळ दिला नसल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या की, मणिपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. त्याठीकाणी दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. आम्ही या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे वेळ मागितली. परंतु आम्हाला बोलू दिलं नाही. असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मणिपूर घटनेचा देशभरातील लोक निषेध व्यक्त करत आहेत. आम्हाला वाटतं की, विधिमंडळाच्या माध्यमातून याबाबत ठराव झाला पाहिजे. त्या महिलांना संरक्षण दिलं पाहिजे. मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहीजे, अशी भावना व्यक्त केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला पाच मिनिटंसुद्धा वेळ दिली नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.