समृद्धी महामार्गावर शून्य अपघात उपाययोजना आखण्यात येईल- मंत्री दादाजी भुसे

महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अफवांचे गालबोट नको

नागपूर,२१ जुलै  / प्रतिनिधी :- हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अविकसित भागाच्या समतोल विकासाचा राजमार्ग आहे. जगातील उत्तमात उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावर अपघात होणारच नाहीत, अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या नागपूर भेटीत त्यांनी समृद्धी महामार्गाच्या संदर्भातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन तास विचारमंथन केले. आज सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर येथील बैठकीमध्ये महामार्गाच्या निर्मितीपासून तर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासात या रस्त्याचे महत्त्व त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले.

     या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, ए.बी. गायकवाड, एस.एस मुराडे, मुख्य महाव्यवस्थापक भारत बास्तेवाड, मुख्य अभियंता एस.के. सुरवसे, निशिकांत सुके, सुरेश अभंग, भूषण मालखंडाळे आदींसह समृद्धी महामार्गाशी संबंधित सर्व जिल्ह्यांचे अभियंते, विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले कंत्राटदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

            विदर्भ, मराठवाडा आदी मागास भागांच्या विकासासाठी या मार्गाची निर्मिती करण्यात आली असून जगातील एक महत्त्वाचा महामार्ग महाराष्ट्रात आकाराला येत आहे. अद्याप हा महामार्ग मुंबईपर्यंत पूर्ण व्हायचा आहे. एकदा हा महामार्ग आपल्या पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले परिश्रम, त्याची फलश्रृती व उभय नेते या रस्त्याबाबत का गंभीर आहेत हे दिसून येतील, असे त्यांनी सांगितले.

            विकासाचा समतोल साधणारा सेतू म्हणजे समृद्धी मार्ग आहे. पूर्णता कार्यप्रवण झालेल्या महामार्गामार्फत महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरेल, प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी त्यांनी आतापर्यंत झालेल्या अपघाताचे विभागामार्फत करण्यात आलेले विश्लेषण जाणून घेतले. अन्य ठिकाणी याच काळात झालेल्या अपघातांची संख्या व या महामार्गावर झालेल्या अपघातांची संख्या याची तुलना योग्य ठरणार नाही. मात्र हा अद्यावतमार्ग अपघातापासून मुक्त असावा, यासाठी जागतिक दर्जाचे सर्व तंत्रज्ञान वापरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जवळपास 20 हजार वाहने रोज या रस्त्याचा वापर करत आहे. या रस्त्याची सकारात्मक बाजूही जनतेपुढे आली पाहिजे. केवळ अफवांमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गालबोट लागतात कामा नये. त्यामुळे दीर्घकालीन व अल्पकालीन उपाययोजना उद्यापासून रस्त्यांवर अमलात आल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले.

            या रस्त्याची आज पाहणी झाल्यानंतर काही धोरणे ठरविण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

            नियमाने चालणारे वाहन चालक, उद्योग व्यापार क्षेत्रातील दिग्गज रस्त्याचे कौतुक करतात. त्यामुळे प्रसंगी कडक शिस्त लावण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. तपासण्याही आवश्यकतेनुसार वाढवण्यात येतील. मात्र यापुढे विभागाने अपघात शून्य महामार्ग ही संकल्पना घेऊन जोमाने कामाला लागावे, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. बैठकीनंतर त्यांनी वायफळ येथून समृद्धी महामार्गासाठी प्रवासाला सुरुवात केली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

काळजी करू नका, तुमची सुरक्षितता आमची जबाबदारी आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसोबत संवाद साधत दिला.

समृद्धी महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता अपघात रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा आज श्री. भुसे यांनी प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर जाऊन घेतला. त्यानंतर त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला.

समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबई या शहरांना जोडणारा अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे. मात्र, गेल्या काही दिवसात या महामार्गावर झालेले अपघात लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी प्रवाशांनीही नियमांचे पालन करीत प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. भुसे यांनी समृद्धी महामार्गाच्या झिरो पॅाईंट तसेच वायफळ टोलनाक्याची पाहणी करीत दौ-याला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी समृद्धी महामार्गाची माहिती मंत्री श्री. भुसे यांना दिली. यात कंट्रोल रुम, वाहनाला आग लागल्यास आग प्रतिबंधात्मक सयंत्र, शीघ्र कृती दल वाहन, वाहनांची टोलनाक्यावर करण्यात येणारी तपासणी, प्रवाशांसाठीचे समुपदेशन केंद्र, ॲम्ब्युल्सची पाहणी केली. यावेळी मंत्रीमहोदयांना आग्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. या महामार्गावर अपघात झाल्यास प्रतिसाद देणारी ॲम्बुलन्स 15 मिनिटाच्या आत पोहोचते. हा कमाल कालावधी आणखी 10 ते 12 मिनिटावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांसोबत मंत्री श्री. भुसे यांनी संवाद साधला. कोल्हापूर येथून आलेल्या बाजीराव गवळी व त्यांच्या कुटुंबीयांसोबत मंत्रिमहोदयांनी समृद्धी महामार्गावरील प्रवासाचा अनुभव जाणून घेतला. समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना निश्चित वेगमर्यादा पाळण्याची गरज आहे. नियम पाळणाऱ्यांना धोका नाही. नागपूरपर्यंतचा प्रवास सुखकर झाल्याची प्रतिक्रिया श्री. गवळी यांनी मंत्रिमहोदयांसमोर दिली.

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहव्यवस्थापकीय संचालक ए.बी.गायकवाड, संजय यादव, एस.एस.मुरडे, महाव्यवस्थापक भारत बास्तेवाड यांच्यासह परिवहन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ओव्हरस्पीड’मध्ये जाणाऱ्या चालकाचे समुपदेशन

महामार्गावर 120 गतीमर्यादा निश्चित केली आहे. मात्र, ही गती ओलांडणाऱ्यांना थांबवून त्यांचे टोल नाक्यांवर समुपदेशन करण्यात येते. मंत्री महोदयांच्या दौऱ्यादरम्यान एका वाहन चालकाचे समुपदेशन सुरु होते. मंत्र्यांनी या चालकाला गती मर्यादा पाळण्याचे आवाहन केले.