मराठवाड्यात १ लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात-सेवानिवृत्त आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालातील भीती 

अहवालातील सत्यता तपासून शासन कार्यवाही करणार आहे का?-एकनाथराव खडसे

मुंबई,२१ जुलै /प्रतिनिधी :- गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून अनेक योजना राज्यासह देशात आल्या आहेत. परंतु, आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? या योजनांची अंमलबजावणी होत नाही म्हणून शेतकरी आत्महत्येकडे वळतोय.

छत्रपती संभाजीनगरचे सेवानिवृत्त आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील १० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या. त्यांनी दिलेल्या फक्त मराठवाड्याच्या अहवालातून असं लक्षात आलं की, १ लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा, मुलींच्या लग्नाच्या वेळेस पैसे उपलब्ध न होणे, कौटुंबिक कारणांसाठी आत्महत्या करणे, शेतमालाला भाव न मिळणे, दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती ही त्यामागील कारणे आहेत. याच अहवालातील सत्यता तपासून शासन कार्यवाही करणार आहे का?

केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु योजनेमुळे शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. म्हणजे ५०० रु. महिना. ही तर शेतकऱ्यांची टिंगल आहे. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी दर द्यायला हवे. ५०० रु. च्या ऐवजी ५००० रु. महिना जर केंद्राने शेतकऱ्यांना दिले असते तर मोदी साहेबांचे त्यात कौतुक करता आले असते. शासनाच्या पोकरा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी, शेतीच्या कामांसाठी व नापिकीसाठी अनुदान दिले जात होते. पण दुर्दैवाने अशी योजना सध्या बंद आहे. या योजनेला अजून मुदतवाढ दिली गेलेली नाही. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशच्या योजना सुरु करण्यासाठी सरकार काय निर्णय घेणार आहे का? ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. यावर्षी सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील बागायती क्षेत्रातील आत्महत्येचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. याची कारणे शोधण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव नाही. यावर सरकार म्हणून काय मार्ग काढणार आहात? शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने असलेले असे अनेक प्रश्न आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात उपस्थित केले.