भाजप विरुद्ध इंडिया 

पंतप्रधान मोदी म्हणतात… हे तर कट्टर भ्रष्टाचारी संमेलन!

भाजपविरोधी पक्षांच्या बैठकीत आघाडीच्या नावावर शिक्कामोर्तब

बंगळुरु : लोकसभा निवडणुकीपूर्वी बंगळुरुमध्ये भाजपविरोधक एकवटले आहेत. विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडली असून या बैठकीत आघाडीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विरोधी आघाडीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे नाव सुचवले आणि त्यावर सर्वांचे एकमत झाले.

विरोधी आघाडीसाठी अखिलेश यादव  यांनी पीडीए (पूर्वीची दलित आघाडी) हे नाव सुचवले होते, पण ते फेटाळण्यात आले. तर एका गटाने सेव्ह इंडिया अलायन्स किंवा सेक्युलर इंडिया अलायन्स हे नाव देखील सुचवले होते.

Indian National Democratic Inclusive Alliance

विरोधकांच्या आघाडीच्या INDIA या नावाचा अर्थ काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

* I – Indian

* N – National

* D – Democratic

* I – Inclusive

* A – Alliance

Indian National Democratic Inclusive Alliance असं या आघाडीचं नामकरण करण्यात आलं आहे. ‘भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी’ असं देखील या आघाडीला म्हटलं जाऊ शकतं.

या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रीय जनता दलानेही (आरजेडी) विरोधी पक्षांची आघाडी हे भारताचे प्रतिबिंब असल्याचं ट्विट केलं आहे. राष्ट्रीय जनता दलाने विरोधी आघाडीच्या नावाबद्दल देखील माहिती दिली आहे. आरजेडीने INDIA शब्दाचे विश्लेषण केले आहे. आता पंतप्रधान मोदींना INDIA म्हणतानाही त्रास होईल, असे देखील राष्ट्रीय जनता दलाने म्हटले आहे.

या बैठकीनिमीत्त बंगळूरू येथे जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही एक चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. आज झालेल्या चर्चेनंतर निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो. असं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीत बोलताना सर्वजण मिळून भाजपचा पराभव करु, असा विश्वास व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधान पदात रस नसून आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचं रक्षण करण्याचा आमचा हेतू असल्याचं सांगितलं. तसंच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र, हे मतभेद विचारधारेशी संबंधित नसल्याचं खर्गे यांनी या बैठकीवेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, विरोधी पक्षांच्या या बैठकीत जागावाटपाबाबत राज्यनिहाय समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर निशाणा

२०२४ मध्ये पुन्हा भाजपच येणार!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधी पक्षांची बैठक  हे बेईमान लोकांचे संमेलन असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. बंगळुरुमध्ये देशातील सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षांच्या बैठकीत २६ पक्षांनी सहभाग नोंदवला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अंदमान-निकोबारवरील वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

image.png

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, विरोधी पक्ष फक्त त्यांच्या कामांना प्राधान्य देतात, ज्यामुळे फक्त त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा फायदा होतो. परिणामी या भागांचा विकास होतं नाही. यामुळे देशातील आदिवासी भाग आणि बेटांच्या विकासात अडथळे येतात आणि येथील जनता सुविधांपासून वंचित राहते.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, ”२०२४ साठी २६ पक्ष एकत्र येत आहेत. काही लोक भारताच्या दुर्दशा करण्यासाठी दुकान उघडून बसले आहेत. हे लोक देशासोबत बेईमानी करण्यासाठी संमेलन भरवत आहेत. हे लोक घोटाळेबाजांना मान देत आहेत. तुरुंगात जाणाऱ्या लोकांना विशेष सन्मान दिला जातो. आजकाल हे लोक बंगळुरूमध्ये जमले आहेत. हे जातीवादी आणि भ्रष्ट लोक आहेत. एका चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या बैठकीबाबत दोन गोष्टींची गॅरंटी मिळते. एक म्हणजे, हे लोक आपल्या दुकानात जातिवादाचं विष विकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लोक असीमित भ्रष्टाचार करतात. आज तर हे लोक बंगळुरुमध्ये एकत्र आले आहेत. एकेकाळी एक गाणं खूप प्रसिद्ध होतं, ‘एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग’, त्याप्रमाणे हे लोकसुद्धा आपल्या चेहर्‍यावर कितीतरी चेहरे लावून बसले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. जेव्हा हे लोक कॅमेर्‍यासमोर एका फ्रेममध्ये येतात तेव्हा देशाच्या जनतेसमोर पहिला विचार काय येतो? देशवासी यांना बघून हेच म्हणतात, ‘लाखो, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार!’, अशा थेट शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचा निशाणा साधत पुढे म्हणाले की, ”२०२४ साठी देशातील जनतेने आपले सरकार परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत भारताच्या दुर्दशेला जबाबदार असलेले काही लोक आपली दुकाने उघडून बसले आहेत. त्यांच्याकडे बघून मला एका कवितेची आठवण होते, ‘गायत कुछ है, हाल कुछ है, लेबल कुछ है माल कुछ है’. हे गाण विरोधी पक्षांसाठी अनुकूल आहे,” असं पंतप्रधान म्हणाले.

विरोधकांच्या सभेवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले, ‘या लोकांना भ्रष्टाचाराची खूप आवड आहे. हे लोक घराणेशाहीचे समर्थक आहेत. हे लोक प्रथम कुटुंबासाठी काम करतात. कुटुंबावर आधारित पक्षाने देशाचा विकास केला नाही. बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत हिंसाचार झाला, पण हे पक्ष काहीही बोलले नाहीत. दारू घोटाळ्यावरही हे पक्ष काहीच बोलत नाहीत.’

विरोधकांकडे भ्रष्टाचार करणा-यांचा होतो सन्मान

विरोधकांबाबत आणखी एक खास गोष्ट अशी की जर एखादा करोडोंच्या घोटाळ्यासाठी जामीनावर असेल तर त्याला सन्मानपूर्वक नजरेने पाहिलं जातं. जर अख्खा परिवारच घोटाळ्यात सामील असेल, तर त्यांची आणखी खातिरदारी केली जाते. एखादा वर्तमान मंत्री घोटाळ्यात सामील असेल, जेलमध्ये गेला असेल तर त्याला खास आमंत्रण देऊन बोलावले जाते. जर कोणी एखाद्या समाजाचा अपमान केला, न्यायालयाकडून त्याला शिक्षा मिळाली तर त्याचा अधिक मानसन्मान केला जातो. जर एखाद्याला करोडोंच्या घोटाळ्यात न्यायालयाकडून शिक्षा मिळाली असेल तर या बैठकीत बसण्याची त्याची पात्रता अधिक वाढते, एवढंच नाही तर त्याच्याकडून हे लोक मार्गदर्शन घेतात, असे एकावर एक टोले पंतप्रधान मोदींनी लगावले.

विरोधक परिवारवादी आहेत

लोकतंत्राचा मंत्र आहे ‘Off the people, by the people, for the people’. पण या विरोधकांचे धोरण आहे, ‘Off the family, by the family, for the family’. ‘फॅमिली फर्स्ट, नेशन नथिंग’ अशी यांची प्रेरणा आहे. यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन, ‘नफरत है, घोटाले है, तुष्टीकरण है, मन काले है, परिवारवादी आग के से देश हवाले है’, अशी जहरी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे अंदमान-निकोबारवरील वीर सावरकर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन केलं आहे. सुमारे ७१० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या कार्यान्वित झाल्यामुळे केंद्रशासित प्रदेशात संपर्क वाढेल. या नव्या टर्मिनलमुळे उड्डाणांची संख्या वाढून पर्यटनाला अधिक चालना मिळेल.