मराठा आरक्षणाबाबत आज आंतरवाली येथे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ-मनोज जरांगे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सबुरीनं घ्या-मंत्री गिरीश महाजन

छत्रपती संभाजीनगर,१६ डिसेंबर / प्रतिनिधी :-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला दिलेली वेळ आता पाळलीच पाहिजे, तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने दिलेला शब्दही पाळला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. त्यावर आरक्षणाच्या विषयावर जरांगे यांनी जरा सबुरीने घ्यावं असा सल्ला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. त्यावर आतापर्यंत सरकारला भरपूर वेळ दिला असं उत्तर जरांगे यांनी दिलं.त्यावर, आरक्षणाबाबत आज, रविवारी आंतरवाली येथे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे जरांगे यांनी या मंत्रिद्वयांना सांगितले. कुणबी नोंदींबाबत आपण समाधानी असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, शिंदे समितीच्या आतापर्यंतच्या अभ्यासाची माहिती या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना दिली. तसेच शिष्टमंडळांने मनोज जरांगे यांच्या तब्येतीचीही चौकशी केली आणि त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळात राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे होते. त्यांनी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली. 

यावेळी गिरीश महाजनांनी मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाच्या विषयावर सबुरीचा सल्ला दिला. त्यावर आतापर्यंत सबुरी घेऊनच राज्य सरकारला एकूण तीन महिन्यांचा वेळ दिल्याचं जरांगे म्हणाले. त्यावर राज्य सरकार वेगाने काम करत आहे, टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आणखी जरा वेळ द्यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. काम अंतिम टप्प्यात आलं आहे, सरकार काहीही लपवत नाही असंही महाजन म्हणाले. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, सरकार वेगाने काम करतंय त्यामुळेच आतापर्यंत 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत, पण सरकारने ठरल्याप्रमाणे केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. 

राज्य सरकारचे शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करतंय, मीडियासमोर नुसता हा हा करतंय, पण नेमकं काय चाललंय तेच समजेना असं मनोज जरांगे म्हणाले. एकीकडे निष्पापांवरील गुन्हे मागे घेणार असं सरकार म्हणतंय, तर दुसरीकडे आंदोलकांना उचलण्याचं काम पोलिसांकडून सुरूच आहे असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे ठरलेल्या अटींवर सरकारने काम केलं पाहिजे अशी आग्रहाची मागणी मनोज जरांगे यांनी केली.मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी २४ डिसेंबर ही मुदत जरांगे यांनी सरकारला दिली आहे. ती वाढविण्याची विनंती करण्यासाठी महाजन आणि भुमरे यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी वरील चर्चा झाली. ‘आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेतल्यासच चर्चेला अर्थ आहे’, असेही जरांगे म्हणाले.