रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांच्या प्रकरणावर किरीट सोमय्यांनी उचलले हे पाऊल

मुंबई,१ जानेवारी  / प्रतिनिधी :-  नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते किरीट सोमय्या हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्याचे प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढले आहे. त्यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरेंविरोधात तक्रार नोंदवली. त्यापूर्वी ३१ डिसेंबरला किरीट सोमय्यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी नवीन वर्षांमध्ये कोणाकोणाला लक्ष करणार याची एक यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज लगेचच त्यांनी रेवदंडा पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे आता रश्मी ठाकरेंवर पोलीस काय कारवाई करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांना निवेदन दिल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, “येत्या काही दिवसांमध्ये रेवदंडा पोलिसांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल दिला जाणार आहे. त्यानंतर येत्या ७ दिवसांमध्ये रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन मला दिले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे १९ बंगले रेकॉर्डवरुन गायब केले. मुख्यमंत्री कार्यालयाने यासाठी संबंधित यंत्रणेवर दडपण आणले. रश्मी ठाकरे यांनी १३ वर्षे या बंगल्यांसाठीची घरपट्टी भरली होती. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात हे प्रकरण दडपण्यात आले.” अशी टीका त्यांनी केली आहे.