पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  फडणवीस- थोरात आमने सामने

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई :-राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून शिंदे सरकारला विविध मुद्यांवरुन घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरु केली आहे. आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचीत मंत्र्यांची सभागृहाला ओळख करुन दिली. यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दालनात प्राप्त झालेले सर्व निवेदन नाकारल्याची माहिती दिल्यानंतर विरोधकांनी त्यावरुन घोषणाबाजी केली.

यानंतर अध्यक्षांनी बाळासाहेब थोरात यांना बोलण्याची परवानगी दिली. यावेळी थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. मान्सून उशिरा सुरू झाल्याने खरिपाच्या पिकांची आणि शेतकऱ्यांची स्थिती गांभीर्यपूर्वक झाली आहे, आतापर्यंत फक्त 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे.मागील काही महिन्यात अतिवृष्टी, गारपिट यामुळे खूप नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहेत, कांद्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती झाली आहे, त्यांना आपण अनुदान जाहीर केले होते परंतु ते अनुदानही अद्याप त्यांना पोहोचले नाही.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळेस आठ दिवसात मदत पाठवतो असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला होता, तोही पूर्ण झालेला नाही.बियाणे खते मोठ्या प्रमाणात बोगस बाजारात आले आहेत. काही सरकारी टोळ्या दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात चालला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, दुर्दैवाने सरकारचे या परिस्थितीकडे लक्ष नाही.त्यांना फक्त मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि दिल्लीला जायचे, यायचे या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांकडे आणि महाराष्ट्राकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.राज्यातील पावसाची स्थिती गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचे  सांगत ५० टक्के क्षेत्रात अद्याप पाऊस नसल्याचे  थोरात म्हणाले. आतापर्यंत फक्त २० टक्के पेरण्या झाल्या असून शेतकरी हवालदिल झालाय. अतिवृष्टी गारपीटमुळे देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. असल्याचे बाळासाहेब म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्लीवारी यामुळे सरकारचे शेतकऱ्यांचं लक्ष नाही. त्यामुळे स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करण्याची मागणी बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार

राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात आला आहे, असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याशिवाय, बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान विभागाने येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. कालच यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही लवकरच मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.

बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्य शासन करेल. त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.