अंधेरी पोटनिवडणूक : उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच, लटके यांचा राजीनामासाठी पालिकेत दबाव

मुंबई,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्यासमोर सरकारी पेच निर्माण झाला आहे. ऋतुजा लटके या महापालिकेत कर्मचारी होत्या. महिनाभरापूर्वी त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. जोपर्यंत लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत ते निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांचा राजीनामा अर्ज तातडीने मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाची भेट घेत आहेत.

राजीनामा मंजूर न झाल्यास ? 

लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास ठाकरे गटासाठी मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके विजयी झाले. काही महिन्यांपूर्वी रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या अंधेरी के पूर्व कार्यालयात कार्यरत होत्या. लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर व्हावा यासाठी शिवसेना नेते अनिल परब, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि सामान्य प्रशासन सहआयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारावा, अशी मागणी केल्याचे वृत्त आहे.