विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वंदेमातरम् आणि राज्यगीताने सुरुवात

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात नवीन मंत्र्यांचा परिचय

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात आज विधानसभेत वंदेमातरम् आणि राज्यगीताने झाली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विधानसभा सदस्य उपस्थित होते.

नवीन मंत्र्यांचा परिचय

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवीन इतर आठ मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचा यामध्ये समावेश आहे.

तालिका सभापती तसेच तालिका अध्यक्षांची घोषणा

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषदेचे तालिका सभापती जाहीर केले. सदस्य सर्वश्री ॲड. निरंजन डावखरे, अरुण लाड, राजेश राठोड, नरेंद्र दराडे यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची घोषणा केली. यामध्ये विधानसभा सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, समीर कुणावार, यशवंत माने, अमित झनक यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली

विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहामध्ये माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत माजी विधान परिषद सदस्य डॉ. माणिकराव पद्मण्णा मंगुडकर आणि प्रभाकर दामोदर दलाल यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडला.

तर, विधानसभेत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांविषयीचा शोकप्रस्ताव माजी मंत्री, विद्यमान लोकसभेचे सदस्य व माजी विधानसभा सदस्य गिरीश बापट, विद्यमान लोकसभेचे सदस्य व माजी विधानसभा सदस्य सुरेश उर्फ बाळू धानोरकर, माजी  विधानसभा सदस्य  सर्वश्री शंकरराव वाकुळणीकर (कोळकर), बाबूराव वाघमारे, रामचंद्र अवसरे या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

शोकप्रस्ताव मांडल्यानंतर उपस्थित सदस्यांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.