मंत्री अतुल सावे यांनी घेतला गृहनिर्माण विभागाचा आढावा

मुंबई,१७ जुलै /प्रतिनिधी :- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज गृहनिर्माण विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी गृहनिर्माण विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

मंत्रालयातील परिषद सभागृहात आज दुपारी आयोजित केलेल्या या बैठकीस यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, उपसचिव अजित कवडे यांच्यासह गृहनिर्माण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. पात्र, झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने कायदे व अधिनियम केले आहेत. त्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या विविध योजनांची गतीने अंमलबजावणी करावी. झोपडीधारकांची पात्रता जलदगतीने निश्चितीसाठी व कामात पारदर्शकता आणण्यासाठी स्वयंचलित परिशिष्ट- २ प्रणालीचे काम त्वरित सुरू करावे. रखडलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी अभय योजना, निविदा प्रक्रियेचा अवलंब करून विकसकाची नियुक्ती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि ‘म्हाडा’च्या संयुक्त उपक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणीची कार्यवाही करावी. रद्द केलेल्या योजनांना गती मिळण्यासाठी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. सावे यांनी गिरणी कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत द्यावयाची घरकुले, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, ‘म्हाडा’च्या योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सद्य:स्थिती, गेल्या वर्षभरात घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची सविस्तर माहिती घेत त्यांनी योजनांमधील अडचणी जाणून घेतल्या. अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे यांनी गृहनिर्माण व झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.