केंद्रीय मंत्री अमित शाहांना भेटल्याच्या चर्चाही निराधार-जयंत पाटील

मुंबई,६ ऑगस्ट /प्रतिनिधी :-राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली. यानंतर राज्यातील काँग्रेस देखील फुटणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या.अशात आता नव्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. अशात आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची गुप्त भेट घेतल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. जयंत पाटील हे देखील अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील जोर धरत आहे. आता यावर खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आज सकाळपासूनच जयंत पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसंच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची देखील चर्चा रंगू लागली होती. दरम्यान, जयंत पाटील यांनी चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सुरु असलेल्या चर्चांवर मी रोज सकाळी येऊन स्पष्टीकरण देणार नाही. रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. रोज गैसरमज पसरवले जात आहेत.रात्री मी, अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा दीड वाजेपर्यंत एकत्र होतो. आज सकाळी मी पवार साहेबांची भेट घेतली. या भेटील पक्षवाढीवर चर्चा पार पडली. लोकांमध्ये माझ्याविषयी गैसरमज पसरवला जात आहे, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.

तसंच पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त फेटाळलं आहे. माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात असून या बातम्यांमुळे माझं मनोरंजन होत आहे. मी कोठे जाणार की नाही, याबाबत काहीही सांगितलं नाही. माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात असून मी माझ्या पक्ष्याशी एकनिष्ठ आहे. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे. तसंच मी केंद्रीय मंत्री अमित शाहांना भेटल्याच्या चर्चाही निराधार असून मी कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.