अजित दादा तुम्ही योग्य ठिकाणी बसलेले आहात; हीच तुमची योग्य जागा -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

“…यामुळे अमित शाहांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम” ; अजित पवारांकडून कौतूक

पुणे,६ऑगस्ट / प्रतिनिधी :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’चं शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती आहे.

या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आपल्या कार्यक्रमात आहेत. ते माझ्यासोबत पहिल्यांदाच बसले आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा तुम्ही योग्य ठिकाणी बसलेले आहात. हीच तुमची योग्य जागा आहे, या ठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशिरच केला, असं वक्तव्य अमित शाह यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाचं अमित शाह यांच्याबरोबर अजित पवार व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हमाले की, “देशात सहकार क्षेत्राचा मोठा इतिसाह असून सहकार ग्रामीण भागापासून शहरात पोहचला आहे. देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय सुरु करण्यात आलं आहे. सहकार हे एकमेव क्षेत्र आहे जे गावागावात पोहचलं आहे. अमित शाह हे गुजरातचे आहेत. पण त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण ते महाराष्ट्राचे जावाई आहेत. कारण प्रत्येक जावायाचं सासरवाडीवर जास्त प्रेम असतं. गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही एकच राज्य होते. या दोन्ही राज्यांचा सहकार क्षेत्रातील इतिहास गौरवशाली राहिला आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

“सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतीक क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी सहकार विभागाने मोठ योगदान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला असून अमित शाह देशाचे पहिले सहकारमंत्री झाले आहेत. देशात साखरेचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात असून आयकरमुळे देशातील सगळेच साखर कारखाने अडचणीत आले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळे साखर कारखाने अडणीतून बाहेर पडले आहेत. अमित शाह यांनी लोकसभेत बील आणून सर्वच साखर कारखान्यांचा टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला”, असं अजित पवार म्हणाले.