देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री करणार का? उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल

मुंबई,६ ऑगस्ट /प्रतिनिधी :-मी भाजपला आज आव्हान देतो, आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचे नाही. आम्हाला अतिरेक्यांना बडवणारा हवा, जगातील सर्वात शक्तीमान नेता विश्वगुरु राज्य करत असताना हिंदूंना जन आक्रोश करावा लागत आहे. मी भाजपची साथ सोडली हिंदुत्व नाही सोडलं, 9 वर्षात शक्तीमान असलेला नेता असताना हिंदू खतरे मे है अशा घोषणा येतात, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पीएम मोदी यांच्यावर हल्ला चढवला. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी संयुक्त मेळावा मुंबईत रंगशारदा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मोदींकडून इंडिया आघाडीची झालेली तुलना, भाजपचे फोडाफोडीचे राजकारण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. हल्ली यांच्यात असे आहेत कपडे अंगावर नसले तरी चालतील, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांनाही टोला लगावला. 

मग देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री करणार का?  

राष्ट्रवादी फोडून सत्तेत सामील झालेल्या अजित पवार यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री देण्यात आले. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी भाजपला खोचक सवाल केला. किती उपमुख्यमंत्री करणार, मग देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री करणार का? अशी  विचारणा त्यांनी केली. उंट देखील आहेत आणि दुसऱ्यांची ओझी वाहणारी गाढव देखील आहेत. मला देवेंद्र फडणवीस यांची दया येते, की ते ओझी वाहणार. भाजपमध्ये राम राहिला असून आयाराम राहिले आहेत. राम मंदिर बांधा पण आयरामाचे काय? असा टोला त्यांनी लगावला. 

होय आम्ही विरोधीपक्ष आहोत 

पीएम मोदी यांनी विरोधी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. भारत मातेच्या हातात आम्ही बेड्या घालू देणार नाही, असे ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, मोदी तुम्ही परदेशात जातात बायडनला मिठ्या मारता, तेव्हा तुम्ही इंडियाचे पंतप्रधान म्हणून जातात की मुजाहिद्दीनचे सेवक म्हणून जाता?  

औरंगजेब तुमच्यामध्ये दडला आहे 

शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे का? फडणवीस साहेब तुमच्या पक्षात आहेत. औरंगजेब तुमच्यामध्ये दडला आहे. सगळीकडे हे आयरामाना मुख्यमंत्री करत आहेत. यांनी घात शिवसेनेचा नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजाशी केला. हल्ली यांच्यात असे आहेत कपडे अंगावर नसले तरी चालतील, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांनाही टोला लगावला. 

राखी बांधून घ्यायची असेल तर बिल्किस बानूकडून घ्या

यावेळी रक्षा बंधन मुस्लिम भगिनीकडून करून घ्या असे मोदींनी आपल्या खासदाराना सांगितले, पण हिंमत असेल मणिपूरच्या भगिनीकडून बांधून घ्या. राखी बांधून घ्यायची असेल तर बिल्किस बानूकडून घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला.