राष्ट्रवादीची खेळी नेमकी काय? तब्बल ‘इतके’ आमदार अधिवेशनात अनुपस्थित!

कामकाजाकडे फिरवली पाठ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अनेक हालचालींना वेग आला आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत  भाजपला पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी वायबी सेंटरला  शरद पवारांची  भेट घेऊन एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला. तर आज सुरु होणार्‍या पावसाळी अधिवेशनात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री आपापली जबाबदारी पार पाडतील असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. मात्र आजच्या अधिवेशनाच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील आमदारांनी कामकाजाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. याचे कारण म्हणजे एकूण ५३ आमदारांपैकी २८ आमदार अधिवेशनाला अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीची आता कोणती नवी खेळी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. तर विधिमंडळ अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सभात्याग केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फुटीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार हे समोर आलेलं नव्हतं, हे आज स्पष्ट होईल अशा चर्चा सुरू होत्या. अजित पवार गटाने आपल्यासोबत ४० पेक्षा जास्त, तर जयंत पाटील यांनी आमच्याकडे १९ आमदार असल्याचे म्हटले होते. जितेंद्र आव्हाड यांनी ९ मंत्री वगळता इतर आमदारांची विरोधी पक्षात बसण्याची व्यवस्था करावी असं पत्र दिलं होतं. मात्र कोणत्या गटात कोण आहे, हे दिसण्यापेक्षा आमदारांनी विधानसभा कामकाजात भाग घेणे टाळल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी पक्षात एकूण ५३ आमदार आहेत. त्यातील नवाब मलिक तुरुंगात असल्यामुळे ५२ आमदार उपस्थित राहणे अपेक्षित होते. त्यापैकी अजित पवारांकडून १५ आमदार उपस्थित होते, तर शरद पवारांकडून केवळ ९ आमदार उपस्थित होते. म्हणजेच एकूण २८ आमदार अनुपस्थित होते.

कोण कोण उपस्थित होते?

शरद पवारांना पाठिंबा दिलेल्या आमदारांपैकी जयंत पाटील, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, सुनील भूसारा, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, सुमन पाटील, रोहित पवार, मानसिंग नाईक हे आमदार उपस्थित असून विरोधी बाकावर बसले होते. तर अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या आमदारांपैकी धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धर्मराव अत्राम, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, अदिती तटकरे, बबन शिंदे, इंद्रनील नाईक, प्रकाश सोळंके, किरण लहमाटे, सुनील शेळके, सरोज अहिरे हे आमदार उपस्थित होते. स्वतः अजित पवार देखील उपस्थित होते.