अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित “कलंकित व घटनाबाह्य” सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्ला

मुंबई,१६ जुलै /प्रतिनिधी :- सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य व कलंकित सरकार, शेतकरी विरोधी, लोक विरोधी सरकार हे राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यास सपशेल अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केले. या असंवैधानिक सरकारने पावसाळी अधिवेशन पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्या वतीने बहिष्कार घालण्यात येत असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीर केले.
    विधान भवनातील वार्ताहर कक्षात आयोजित विरोधकांच्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे बोलत होते. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार अशोक चव्हाण, भाई जगताप , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आमदार सुनील प्रभु यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
     सोमवार १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची आज बैठक पार पडली.
  “कांद्याला सरकारने ३५० रुपये जाहीर करूनही एकही रुपया अनुदान शेतकऱ्यांना सरकारने दिला नाही. पूर्वी १२ हजार रुपये असलेला कापसाचा भाव ६ हजार रुपयांवर आला आहे. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आजही कापूस साठा घरी करून ठेवला आहे. सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दुपटीने सोडा पण एक रकमीही दिली नाही.
कांद्याच्या अनुदानाबाबत घोषणा केली मात्र मदतीअभावी शेतकऱ्यांनी मोठया संख्येने आत्महत्या केली आहे,”अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर हल्ला चढविला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे ही माझी प्राथमिक जबाबदारी असल्याची घोषणा
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केली मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका दानवे यांनी केली.
 
  राज्यात मोठया प्रमाणात होत असलेले खून, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना,  दिवसा ढवळ्या कोयत्याने मुलीवर झालेला वार, नागपूरमध्ये गावठी कट्टे विकण्याचे वाढलेले प्रमाण या सर्वांवरून राज्यात मोठया प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याची टीकाही दानवे यांनी केली.
  राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दंगली या
या सर्व सरकारने घडवल्या की काय अशी शंका निर्माण होत असल्याची शक्यता दानवे यांनी बोलून दाखवली.

समृद्धी महामार्गाच्या बांधकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून हा मार्ग जनतेचा जीव घेण्यासाठी केला का असा सवाल देखील दानवे यांनी यावेळी उपस्थित केला.