राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री शरद पवारांच्या भेटीला:राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार ? प्रफुल्ल पटेल यांचा शरद पवार यांना प्रस्ताव

मुंबई : अजित पवारांसोबत भाजप सरकारला पाठिंबा दर्शवलेल्या मंत्र्यांची आज अजितदादांच्या निवासस्थानी देवगिरीवर बैठक पार पडली. यानंतर हे सर्व मंत्री तडक शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले आहेत. येवल्यात सभा घेतल्यानंतर शरद पवार यांनी कोणतंही राजकीय वक्तव्य केलं नव्हतं, त्यामुळे या सभेत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यासह बाय बी चव्हाण येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत जवळपास तासभर चर्चा चालली. यानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हा सर्वाचे दैवत आदरणीय शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली. शरद पवार हे आज बैठकीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे असल्याचं समजल. यामुळे वेळ न मागताच भेट घेतली असल्याचं पटेल म्हणाले.

यावेळी प्रफुल्ल पटले यांनी शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहील यावर चर्चा यावर विचार करुन येत्या काही दिवसात मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा देखील प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना दिला. यावेळी शरद पवार यांनी आमचं म्हणणं ऐकूण घेतलं मात्र, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असं प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितलं.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील व जितेंद्र आव्हाडदेखील विधानभवनातून थेट देखील वायबी चव्हाण सेंटरकडे रवाना झाले आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना जयंत पाटील म्हणाले की, मला सुप्रिया सुळेंचा फोन आला की ताबडतोब या ठिकाणी या, त्यामुळे मी निघालो आहे. कशाकरिता बोलावलं आहे किंवा तिथे कोण आलं आहे, याबद्दल मला काहीच माहित नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज बरोबर दोन महिन्यांनी दोन्ही गटांचे सर्व प्रमुख नेते एकमेकांना भेटत असल्याने ही राष्ट्रवादीच्या दृष्टीने खूप मोठी घडामोड आहे. सर्वच नेतेमंडळी वायबी चव्हाण सेंटरला दाखल झाल्याने ही कोणतीही सदिच्छा सभा नसावी, हे स्पष्ट समजत आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होणार्‍या अधिवेशनात जनहितांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय घडामोडींवरच चर्चा होणार की काय अशी चिन्हे दिसत आहेत.