केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारचे आंदोलन

मुंबई ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- केंद्र सरकार विरोधकांना नामोहरम करण्यासाठी यंत्रणाचा गैरवापर करुन लोकशाही धोक्यात आणू पाहत आहे. राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करुन त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून दबाव आणण्याचे काम सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच लोकशाहीची बुज राखण्यासाठी आज महाविकास आघाडीतील मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन केले.

Image

नवाब मलिक यांच्यावर लावलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Image

केंद्र सरकारच्या धोरणांचा जे लोक सक्षमपणे विरोध करत आहेत, त्या लोकांना टार्गेट करण्याचे काम मागील दोन-अडीच वर्षांपासून सुरु आहे. नवाब मलिक यांच्यावर लावलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, हे तपशील पाहिल्यावर लक्षात येते, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आज महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ झालेल्या धरणे आंदोलनात जयंत पाटील सहभागी झाले. यावेळी ते बोलत होते.

नवाब मलिक अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे ते काम करत आहेत, त्यांच्यावर याआधी कोणताही गंभीर आरोप झालेला नाही. २०-२५ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या प्रॉपर्टीवर बोट ठेवून ज्याचा संबंध नाही, अशा व्यक्तीला तुरुंगात टाकणे, या प्रकरणाचे कनेक्शन अतिरेकी संघटनांशी जोडणे हे योग्य नाही, असे ते म्हणाले. तसेच हा प्रकार भारतातील जनतेच्या लक्षात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे आम्ही यावर अधिक भाष्य करणार नाही. पण याचा निषेध करणे तसेच केंद्र सरकारच्यावतीने विरोधकांना नामोहरम करण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत, त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आज जमलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रभर यासंबंधीच्या प्रतिक्रिया उमटणार आहेत. कोणत्याही अन्यायाला सक्षमपणे विरोध करणारा हा महाराष्ट्राचा माणूस आहे. मला खात्री आहे की, अशा जाचक कारवाईचा विरोध महाराष्ट्रातील जनता निश्चितच करेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही. कारण रोज उठून त्यांनी कुणावरही कारवाई केली तर त्याचा राजीनामा घेता येणार नाही. मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त लोकांना कशी अटक करायची हे त्यांचे स्वप्नच आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीला प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही. नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मत आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ईडीचा पेपर फुटलाच कसा? ईडी कारवाईची माहिती आधीच देणाऱ्या भाजप नेत्यांवर कधी कारवाई होणार? – खा. सुप्रियाताई सुळे

ईडीची कुठलीही कारवाई होते तेव्हा महिन्याअगोदरच त्या कारवाईसंबंधीच्या बातम्या बाहेर कशा येतात? दहावीचा एखादा पेपर फुटला की परीक्षा रद्द होते. शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. मग ईडी कारवाईच्या बातम्या बाहेर येतात तेव्हा ईडीचा पेपर फुटल्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे मुंबई येथे आयोजित धरणे आंदोलनात त्या बोलत होत्या.

ईडीच्या बातम्या भाजपच्या नेत्यांना कशा मिळतात याची चौकशी व्हावी, अशी मागणीही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सुप्रियाताईंनी सांगितले. कोणताही व्यक्ती एकदा मंत्री झाला की तो पक्षाचा न राहता देशाचा मंत्री होतो. मा. अमित शाह हे देशाचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे एक महिला म्हणून मी न्याय मागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

विरोधी पक्षातील काही लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भाजपची पोलखोल बऱ्याच काळापासून नवाब मलिक करत आले आहेत. त्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. जेव्हा नवाब मलिक धमक्यांना जुमानत नाहीत असे दिसायला लागले तेव्हा त्यांच्यावर खोट्या आरोपांची राळ उठविण्यात आली, असेही त्या म्हणाल्या.आमचे सरकार दडपशाहीचे सरकार नाही.

विरोधकांनी विरोध करत राहावा त्यांचा तो अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकारला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, ती आम्ही करत राहणार. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आम्ही फार गांभीर्याने घेत नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रियाताईंनी दिली.