बच्चू कडू यांचा दिवस गोड होणार? विधानसभेतील ग्रँड एंट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या आवारात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची ग्रँड एंट्री चर्चेचा विषय ठरली. कडू यांनी आज विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीतून एन्ट्री घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून त्यांना मंत्रिपदाचा शब्द मिळाला असल्याची चर्चा भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये दबक्या आवाज सुरु होती.

मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर सातत्याने नाराजी व्यक्त करत मागील आठवड्यात बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मंत्रिपदाचा दावा मी सोडणार होतो पण मुख्यमंत्र्यांचा फोन आला आहे. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. १७ तारखेला मी शिंदेंना भेटणार आहे. त्यानंतर १८ तारखेला मी माझी भूमिका मांडणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.

त्यानंतर आज बच्चू कडू यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांनी सबुरीने घेण्याचा सल्ला देत मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं आश्वासन दिलं. अधिवेशनानंतर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं. या बैठकीनंतर शिंदेंनी कडू यांना आपल्या गाडीत घेऊन थेट विधानभवन गाठलं. यामुळे कडू आणि शिंदे यांच्यातील चर्चा यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनुसार मी मविआला पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिल्याने मी मंत्री झालो. मविआ काळात दिव्यांग मंत्रालय झालं असतं तर शिंदेंसोबत मी गेलो नसतो. बदलत्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. मंत्रिपदाचा दावा मी सोडणार होतो पण मुख्यमंत्र्यांचा फोन आला आहे. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. १७ तारखेला मी शिंदेंना भेटणार आहे. त्यानंतर १८ तारखेला मी माझी भूमिका मांडणार आहे.