शरद पवारांच्या पत्नीची प्रकृती बिघडली, ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या कारणास्तव आणि कोणत्या प्रकारची आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. शरद पवार हे सुद्धा तातडीने ब्रिच कँडीरुग्णालयात दाखल झाल्याचे समजते.

मागिल काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीमुळे पवार कुटुंबीय जोरदार चर्चेत आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक घडामोड मानली जात आहे. खास करुन गेली अनेक दशके राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार यांच्यासाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला गेला आहे.

अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये ते सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांना धडा शिकवण्यासाठी आणि पक्षात सुरु असलेली पडझड थोपवण्यासाठी स्वत: शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार राज्यात जंगजंग फिरुन कार्यकर्त्यांना आपली भूमिका सांगताहेत. त्यातच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहीत पवार वगळता पवार कुटुंबीयांतील कोणीही अजित पवार यांच्या राजकीय निर्णयावर भाष्य केले नाही.