अखेर अनिल देशमुख येणार तुरुंगाबाहेर; उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

मुंबई ,२७ डिसेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाविरोधात सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात आव्हान करण्यासाठी उच्च न्यायालयाने १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु, ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला होता. जामिनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आता अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.

कथित १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने गेल्या वर्षी अटक केली होती. अटकेनंतर देशमुख यांना कोराना झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. विशेष म्हणजे तब्बल १३ महिन्यांनंतर त्यांना याप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला. त्यांचे वकील अनिकेत निकम यांनी माहिती दिली की, अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर १० दिवसांची स्थगिती दिली. न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्यांचे पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे, पुढील तपासात सहकार्य करणे, अशा अटी लागू केल्या. सध्या त्यांची प्रकृती खालावल्याने जसलोक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.