ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित मेडीकल ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण

ऑक्सीजन निर्मिती राज्यातच करण्यास प्राधान्य

अहमदनगर ,१८मे /प्रतिनिधी :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करणे आणि राज्याची असणारी दैनंदिन तीन हजार मेट्रीक टन ऑक्सीजन निर्मिती राज्यातच होईल, यासाठी प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, श्री साईबाबा विश्वस्त संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आदीसह रिलायन्स फाऊंडेशनचे पदाधिकारी आदी मान्यवर या कार्यक्रमात दूरदूश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसर्‍या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनी युक्त असले पाहिजे. पहिल्या लाटेनंतर आपण आरोग्य सेवा वाढविण्यास प्राधान्य दिले. दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्याने आणि रुग्णांना ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत असल्याचे दिसून आले. आपल्याला ऑक्सीजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच अशा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले. आपल्या राज्यासाठी आवश्यक ऑक्सीजन निर्मिती राज्यातच व्हावी यासाठी ठिकठिकाणी असे प्रकल्प उभारणी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री साईबाबा यांनी कायमच गरीब-गरजूंना मदत केली आहे. त्यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो भक्त देश आणि विदेशात आहेत. साईबाबा संस्थानने हाच सेवेचा वारसा पुढे चालविल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले, संस्थानने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा घेतलेला निर्णय हा रुग्णांचे जीव वाचविणारा ठरणार आहे. याशिवाय, आरटीपीसीआर चाचण्यांमधून बाधितांना शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे. संस्थानने नेहमीच संकटाच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करुन साईबाबा संस्थानने सामाजिक बांधीलकी जपली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात ऑक्सीजन तुटवडा असल्याचे दिसून आले. त्यातून आपण मार्ग काढला. उद्योगांसाठी लागणारी ऑक्सीजन निर्मिती कमी करुन मेडीकल ऑक्सीजन निर्मितीला प्राधान्य दिले. तसेच आता विकेंद्रीत पद्धतीने ठिकठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी होत आहे. राज्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या पद्धतीने  सामना केला त्याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि अगदी उच्च न्यायालयानेही घेतली, असे त्यांनी नमूद केले. दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग बाधित होण्याचे प्रमाण दिसून आले तर संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे, त्याचा सामना करण्यासाठी आपण पूर्वतयारी करत आहोत. त्यासाठी अधिक काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या या लढ्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस सर्वजण सहभागी असल्याचे ते म्हणाले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना करताना ज्या ज्या अडचणी येत आहेत. त्याला सामोरे जात आरोग्य सुविधा बळकट केल्या जात आहेत. सध्या ऑक्सीजनची रुग्णांना आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संकट वाढल तर त्याचा सामना करण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे यातूनच साईबाबा विश्वस्त संस्थानमार्फत हा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प  सुरु करण्यात आला. जिल्ह्यात मध्यंतरी रुग्णसंख्या वाढली होती. ती आता घटताना दिसते आहे. चाचण्यांची संख्या वाढवून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा कोरोना संसर्ग रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सध्या आपण कोरोनाशी संघर्ष करतो आहोत. आरोग्य सेवेचे बळकटीकरण करताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा ताण हा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर येत आहे. श्री साईबाबा विश्वस्त संस्थानने शिर्डी येथे कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. याशिवाय आता आरटीपीसीआर चाचण्या याठिकाणी होणार आहेत. त्यामुळे या परिसरातील रुग्णांना वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी आरोग्य सेवा मिळू शकणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, कोरोनाच्या संकटाचा मुकाबला राज्य शासन करीत आहे. राज्यात विकेंद्रीत पद्धतीने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. शिर्डी साईबाबा विश्वस्त संस्थानने त्यासाठी पुढाकार घेतला ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले.

असा आहे ऑक्सिजन प्रकल्प

प्रास्ताविकात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटे यांनी या प्रकल्पाकरीता रिलायन्स फांऊडेशन  तर्फे अनंत अंबानी व साईभक्त व्ही. रमणी यांनी आर्थिक सहाय्य केले असल्याची माहिती दिली.
संस्थानच्या वतीने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. सदर प्लॅन्टची क्षमता 1200 लीटर प्रति मिनिट असून त्याद्वारे साईनाथ रुग्णालयातील 300 बेड करीता ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. सदर प्रकल्प पर्यावरण पूरक असून तो 24 तास कार्यरत राहणार असून त्याकरीता कोणत्याही कच्च्या मालाची आवश्यकता लागणार नाही. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी मानले.