आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस

‘या’ अवधीच्या आत द्यावे लागणार उत्तर

नवी दिल्ली,१४ जुलै  / प्रतिनिधी :-  आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून  नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे.

सत्त्तासंघर्षाचा निकाल ११ मे ला लागल्यानंतरही १६ आमदारांच्या अपात्रतेची  कारवाई अजून करण्यात आलेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या बाबतीत अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी याचिका ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं होतं. आज सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. सध्या अपात्रतेच्या प्रकरणावर काय प्रक्रिया चालू आहे, यासंबंधी अध्यक्षांना या नोटीसवर उत्तर द्यावे लागणार आहे. या उत्तरासाठी २ आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.

हा अवधी अध्यक्षांना प्रक्रियेबाबत केवळ त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी देण्यात आला असून निकालाची अपेक्षा करण्यात आलेली नाही. या नोटीसवर उत्तर देण्यासाठी लागणार्‍या कालावधीमुळे हे प्रकरण लांबण्याची देखील शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांना ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी याचिका ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. तसेच तो निश्चित कालावधीमध्ये घेणं अपेक्षीत असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. मात्र आता सुनावणीस विलंब होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाकडून आता विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन आठवड्याच्या आत उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सर्व प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

 आमदारांना नोटीस  

दरम्यान शिवसेना पक्षाच्या घटनेचा अभ्यास करून या प्रकरणावर निर्णय घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं होतं. निवडणूक आयोगाकडून पक्षाची घटना मिळताच राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली आहे. त्यांना सात दिवसांच्या आत आपलं म्हणण सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजानण्याचे आदेश दिले असल्याचं मला माध्यमांमधून समजले  असल्याचे  राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे नोटीसचा संपूर्ण अभ्यास करुन मी यावर पुढील निर्णय घेईल, असे  देखील राहुल नार्वेकर यांनी मत व्यक्त केले  आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. यावर आमदारांनी उत्तर दिली का? याबाबत प्रश्न विचारला असता, यावर सचिवालयाकडून माहिती घ्यावी लागेल  असे  नार्वेकर म्हणाले आहेत.