नांदेड जिल्ह्यात दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

एकवीस बाधितांना बरे झाल्याने सुट्टी

नांदेड दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 10 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 234 वर पोहचली आहे. एकाबाजुला बाधितांची संख्या आज वाढली जरी असली तरी दुसऱ्या बाजूला पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 21 बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याने मोठा दिलासाही मिळाला.

दहा बाधितांपैकी 7 पुरुष तर 3 महिलांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 22, 26, 30, 36, 49, 55 व 61 वर्षाचे 7 पुरुष तर महिलांमध्ये 20, 55 व 5 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण 160 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत. आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील 74 वर्षाचा पुरुष आणि नांदेड चौफाळा येथील 52 वर्षाची एक महिला असे दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हे दोन रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार घेत होते. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास, मधुमेह आदी आजार होते. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.

शुक्रवार 12 जून रोजी प्राप्त झालेल्या 47 अहवालापैकी 37 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत 61 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 5 बाधितांपैकी 50, 65 वर्षाच्या दोन महिला आणि 38, 52 व 54 वर्षाचे तीन पुरुष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.नांदेड जिल्ह्यात 61 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 36, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित आणि 1 बाधित हा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून औरंगाबाद येथे 4 बाधित व्यक्ती संदर्भित झाला आहे. शुक्रवार 12 जून रोजी 113 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 361, घेतलेले स्वॅब 4 हजार 809, निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 191, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 10, एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 234, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 181, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83, मृत्यू संख्या- 13, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 160, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 61, स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 113 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *