पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव -देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट 

 तर दोन दिवसांत सरकार का कोसळलं ? -शरद पवार 

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधीमध्ये शरद पवारांच्या मर्जीने झाला होता पण पवारांनी ऐनवेळी माघार घेतली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला पटलवर करताना शरद पवार यांनी, आम्ही सरकारला पाठिंबा देणार होतो, पण दोन दिवसआधीच मी माघार घेतली होती. माझा पहाटेच्या शपथविधीला पाठिंबा होता, तर दोन दिवसांत सरकार का कोसळलं ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेबांचं शेवटी सत्य बाहेर आलं, मला याचा अतिशय आनंद झाला, उरलेलं अर्धसत्य मी बाहेर काढीन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार साहेबांना शेवटी सत्य सांगावं लागलं, याचा मला अतिशय आनंद आहे. मी जी गुगली टाकली, त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आले. पण ते अर्धच सत्य आहे. उरलेले सत्य मी बाहेर काढेन. त्यांच्या गुगलीमुळे मी क्लीनबोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच क्लीन बोल्ड झाले आहेत. अजून अर्धसत्यच बाहेर आलेय, उरलेले सत्य लवकरच बाहेर येईल, माझ्या दुसऱ्या गुगलीने उर्वरित सत्य बाहेर येईल, असे देवेंद्र पडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल केली एकप्रकारे आमचा डबलगेम केला. मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनीच केले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढंच नव्हे तर ‘भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. पण ‘शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी ऐनवेळी पवारांनी माघार घेतली, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले, शपथविधीची तयारी झाल्यामुळे अजित पवारांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. शपथविधीसाठी शरद पवार येतील असे अजित पवारांना वाटले होते. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना विश्वासात घेऊनच केला,  असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला भाजपच्या आणखी एका बड्या नेत्यानेही दुजोरा दिला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ते म्हणाले, फडणवीस यांनी सांगितलेले १०० टक्के खरे आहे. भाजप – राष्ट्रवादीची आघाडी फायनल झाली होती. शरद पवारांनी पालकमंत्री व जिल्हेही ठरवले होते, असे त्यांनी म्हटले आहे.

मुनंगटीवारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जातील असे आमच्या मनातही आले नव्हते. कारण आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मोठ्या मनाने त्यांना जागाही दिल्या. आम्ही आमच्या पक्षातून त्यांना उमेदवार दिला होता. साताऱ्यातील भाजपचा उमेदवार हा शिवसेनेचा म्हणून जाहीर केला. कोणत्याही राजकीय पक्षात असे होत नाही. पण आम्ही ते केले, असे मुनगंटीवार म्हणाले.