महसूलमंत्र्यांकडून अतिवृष्टीबाधित गावांची पाहणी; तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

शिर्डी, ​१०​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज राहाता तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. महसूलमंत्र्यांनी यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

राहाता तालुक्यातील तालुक्यातील पाथरे बु., हणमंतगाव व लोणी या गावातील शेती पिकांची  त्यांनी पाहणी केली. यावेळी महसूलमंत्र्यांच्या हस्ते अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. या दौऱ्यात शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, मंडलाधिकारी अनिल मांढरे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून सोयाबीन, मका व कापसाच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शेतात येणारा अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. चारींचा पाण्याचा प्रवाह अखंडीतपणे सुरू राहण्यासाठी चारी खोलीकरण काम करावे. पाण्याचा प्रवाहास कोणी अडथळा आणत असेल तर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. रस्त्यांवर झालेली अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावीत.  असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना

अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. एकही शेतकरी मदतीपासून वंचित  राहू नये, पंचनामे प्रत्यक्ष शेतात जाऊन सविस्तर, अचूक करा. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेऊन प्रत्येक नुकसानीची तपशीलवार नोंद घ्यावी. घरांची पडझड, पशुधनाची हानी, इतर जिवीत हानी आदी पंचनाम्याची तसेच तात्काळ मदतीची प्रक्रिया पूर्ण करावी. असे निर्देश ही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, अतिवृष्टीत बाधित गावांची पाहणी केल्यानंतर महसूलमंत्र्यांनी राहाता येथील अतिवृष्टीबाधित परिसराचीही पाहणी केली.