वैजापूर तहसील कार्यालयात ‘कोतवाल राज’ ; अधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या कोतवालांचा तहसीलवर कब्जा चिरीमिरीशिवाय कामच होत नाही

वैजापूर ,२६ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तहसील कार्यलयातील कारभार म्हणजे ‘ऐकावे ते नवलच’ असाच आहे. येथील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांच्या मर्जीतील बनून कोतवालांनी चक्क तहसीलवरच कब्जा केल्याचे चित्र आहे. प्रत्येक कामासाठी कमिशन देण्याचा अलिखित नियमच या कोतवालानी बनविला असून त्यासाठी नागरिकांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे कोतवाल गावांचे की अधिकाऱ्यांचे ? असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.

गावपातळीवरील महसूल विभागाची कामे सुरळीत पार पाडावीत यासाठी वैजापूर तालुक्यात जवळपास ४२ कोतवालांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापैकी ४ कोतवालांची तहसील कार्यलयात, ४ कोतवालांची उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर ग्रामीण भागात ३४ कोतवालांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, खरे वास्तव काही वेगळे असून या सर्व कोतवालांनी आजघडीला तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागात आपला डेरा जमवला आहे. विशेष करून तहसील मधील रोहयो व गौण खनिज विभागात काही कोतवाल कित्येक वर्षापासून एकच ठिकाणी चिकटले आहे. आश्चर्य म्हणजे या कोतवालांचा रुबाब पाहून नागरिकांना असा प्रश्न पडतो की काम सांगावे तरी कुणाला ? तहसीलमध्ये गौण खनिज व रोहयो विभाग मलाईदार खाते समजले जाते. त्यामुळे या विभागाशी संबधित ठेकेदार व वाळू माफियांसोबत सर्व सेटिंग व कलेक्शन करण्याची जबाबदारी येथील कोतवालच संभाळत असल्याची चर्चा आहे  धक्कादायक म्हणजे रात्रीच्या वेळेस अधिकाऱ्याचे शासकीय वाहन घेवून हे कोतवाल थेट नदीपात्रात जाउन अधिकारशाही गाजवून वाळू माफियांशी तोडपानी करत असल्याच्या तक्रारीही  अनेकवेळा समोर आल्या आहेत. सर्वच विभागात कोतवालांनी डेरा जमवल्याने नागरिकांची कोणतीच कामे सरळ मार्गाने होत नाही.यासाठी कोतवालानी बनवलेल्या रेटकार्ड प्रमाणेच कामे मार्गी लागत असल्याची ओरड नागरिकातून होत आहे.

सध्या मी नवीन आहे-तहसीलदार सावंत

येथील तहसील कार्यालयात कोतवालांची चलती असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मी नवीनच पदभार स्वीकारला असून आठ दिवसापूर्वीच येथे रुजू झालो आहे. तहसील कार्यालयात विविध विभागात ‘डेरा’ टाकलेल्या कोतवालांची माहिती मागवली आहे. असे तहसीलदार सावंत यासंदर्भात बोलताना म्हणाले.