महावितरणने शेतकऱ्यांच्या शेतात बसविलेल्या रोहित्राचे भाडे द्या ; अन्यथा आत्मदहन मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप आवारे यांचा इशारा

वैजापूर,३१ मार्च /प्रतिनिधी :- महावितरणतर्फे वैजापूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रोहित्र बसवण्यात आले आहेत. या रोहित्राचे संबंधित शेतकऱ्याला भाडे देणे बंधनकारक असताना आतापर्यंत शेतकऱ्याला भाडे देण्यात आले नाही. याबाबत कार्यवाही न झाल्यास 31 मार्च रोजी औरंगाबाद येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आत्मदहन करु असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  जिल्हाध्यक्ष दिलीप आवारे यांनी दिला आहे. त्यांनी याबाबत महावितरणचे मुख्य अभियंता (औरंगाबाद) यांना निवेदन दिले आहे. 

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, महावितरणच्या कार्यक्षेत्रातील गावात ज्या शेतकऱ्याच्या शेतात कंपनीकडुन रोहित्र बसवण्यात आले आहेत त्या रोहित्राचे शेतकऱ्याला भाडे देणे बंधनकारक आहे. मात्र असे असतांना आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे मनसेतर्फे १७ फेब्रुवारी रोजी कार्यालयास निवेदन देऊन शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत विऩती करण्यात आली होती. मात्र या निवेदनाची दखल न घेण्यात आल्याने शेतकरी मोबदल्यापासुन वंचित आहेत. त्यामुळे महावितरणच्या औरंगाबाद येथील कार्यालयासमोर सरण रचुन आत्मदहन करु असे दिलीप आवारे यांनी निवेदनात म्हटले आहे.