विहिरीत पाय घसरून पडल्याने नाऊर ग्रामपंचायतचे माजी सदस्य नितीन शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू

वैजापूर ,२७मे /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील बाभूळगावगंगा शिवारातील विहिरीत पाय घसरून पडल्याने नाऊर ग्रामपंचायतचे माजी सदस्य नितीन रमेशराव शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली.
नाऊर येथील तरुण शेतकरी नितीन शिंदे (वय 44) हे रात्री बाराच्या सुमारास विद्युत मोटार सुरु करण्यासाठी त्यांच्या बाभूळगावगंगा शिवारातील गट नंबर 126 मधील शेतात गेले असताना विहिरीत पाय घसरून पाण्यात पडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. वैजापूर महावितरण विभागाची रात्री 12.00 वा.ची लाईट असल्याने आपल्या शेतीतील पिकाला पाणी द्यायचे म्हणून ते शेतात गेले होते.मात्र लाईटची वेळ होऊन सुद्धा मोटार का सुरु झाली नाही ? म्हणून विहिरीजवळ जावून पाहत असताना पाय घसरून  विहिरीमध्ये पडले असल्याची चर्चा उपस्थितानी व्यक्त केली.  सकाळ झाली गायांचे दुध काढायचे असुन आपला मुलगा नितीन अद्याप घरी का आला नाही ? म्हणून मयत नितीनचे वडील रमेशराव शिंदे व त्यांचे काम पाहणारा व्यक्तीसह शेतात जावुन पाहणी केली असता नितीन हा विहिरीत पडलेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गावातील व्यक्तीना सांगितल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली.  पोलिस पाटील श्री. लकारे यांनी दिलेल्या खबरी वरुन विरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय नरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल जी.एच. पंडुरे यांचेसह पोलिस नाईक परमेश्वर चंदेल यांनी घटनास्थळी पंचनामा केला असुन विरगाव पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यु क्रं 15/22 ने नोंद घेतली असुन पुढील तपास हेड कॉस्टेबल जी.एच. पंडुरे हे करत आहे.  मयत नितीनच्या पश्चात आई -वडील, पत्नी, 1 मुलगा 1 मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पंचायत समितीचे माजी सभापती पी.आर.शिंदे यांचा ते पुतण्या होत. अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
गावातील सर्व दुकाने स्वंयस्फुर्तीने बंद –मयत नितीन शिंदे यांचा स्वभाव अतिशय शांत , मनमिळावू व सर्वांविषयी आदरभाव ठेवणारा होता.  त्यांच्या अकस्मात मृत्यूची चर्चा सकाळीच संपूर्ण गावभर समजल्याने सर्व व्यावसायिकांनी आपली  दुकाने बंद ठेवून श्रद्धाजंली अर्पण केली .

रात्रीच्या लाईटमुळेच तरुण शेतकऱ्याचा मृत्यु
महावितरणच्या भोंगळ कारभार तसेच रात्रीच्या लाईटमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, सर्पदंश विद्युत तारेला चिकटून किंवा आज घडलेली ही घटना रात्रभर लाईट न आल्यामुळे झाला आहे. रात्रीचा विद्युत पुरवठ्या ऐवजी शेतकऱ्यांना दिवसाची लाईट मिळावी हा मृत्यु महावितरणच्या व्यवस्थेचा होता अशीच चर्चा सोशल मिडिया सह सर्वत्र होत होती.