वैजापूर तालुक्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा रोडावला ; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार

वैजापूर ,२१ जून/ प्रतिनिधी :-  जून महिना अर्धा उलटला तरी तालुक्यात पाऊस नाही त्यातच जलसाठेही रोडावल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील सर्व मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी साठा जवळपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे चालु हंगामात जोरदार पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. 

वैजापूर शहरालगत नारंगी मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पातुन शहरासह लाभक्षेत्रातील गावांची तहान भागवली जाते तसेच सिंचनासाठीही या पाण्याचा उपयोग होतो. प्रकल्पाची एकुण संचय क्षमता १३.२९० द.ल.घ.मी असुन मृतसाठा वगळता ११.४९० द.ल.घ.मी एव्हढे पाणी उपयोगाचे आहे. कमाल पाणी पातळी ५३३.४०० मीटर असतांना सद्यस्थितीत ५२९.९० मीटर पर्यंत पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे धरणात केवळ १.२ द.ल.घ.मी उपयुक्त पाणी साठा असुन हा साठा एकुण क्षमतेच्या केवळ ११.२८ टक्के आहे. शहराला नाशिक पाटबंधारे विभागातर्फे दर दोन महिन्यांनी घोयगांव (ता.‌कोपरगाव) येथील वैजापूर नगरपालिकेच्या साठवण तलावात आवर्तन सोडण्याचा करार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुर्णपणे नारंगीवर अवलंबुन नसला तरी अन्य गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील बोरदहेगाव येथे देखील मध्यम प्रकल्प असुन या प्रकल्पात पाणी पातळी खालावल्यामुळे उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आला आहे. या प्रकल्पाची क्षमत नारंगीपेक्षा किंचित जास्त म्हणजे १३.४०० दलघमी आहे. त्याचप्रमाणे कोल्ही मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा देखील शुन्यावर येऊन ठेपला आहे. याशिवाय तालुक्यातील बहुतांश लघुप्रकल्पातील पाणीपातळी जोत्याच्या खाली आल्यामुळे आगामी काळात पाऊस न पडल्यास पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या डोंगरथडी भागासाठी वरदान असलेल्या मन्याड येथील साठवण तलावाची एकुण क्षमता ४.७५० दलघमी असुन त्यापैकी तीन दलघमी पाणी वापरता येते. सध्या या तलावात केवळ १४.३३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्याचप्रमाणे बिलवणी, खंडाळा, सटाणा व जरुळ येथील लघु तलावातील उपयुक्त पाणी साठा पुर्णपणे संपला आहे. गाढेपिंपळगाव येथील लघु तलावात केवळ २० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे‌त.