चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना 50 टक्के फी आकारण्यात यावी-आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,१३ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच फी घेण्यात यावी तसेच शिष्यवृत्ती व ईबीसी चा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा अशी मागणी शिवसेना आमदार प्रा.रमेश पाटील बोरणारे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे एका कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आले असताना आ.रमेश पाटील बोरणारे यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ पडला आहे. त्यातच कोविड-19 मुळॆ महाविद्यालये बंद असतांना देखील ऑनलाईन तासिकांची विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल करण्यात आली.त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना 50 टक्के फी आकारण्यात यावी तसेच यावर्षांपासून बीबीए,बीसीए व बीसीएस च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व ईबीसीचा लाभ मिळावा.अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.